महामार्गावरील 24 तास गस्त बंद करू नका ; वाहनचालकांकडून मागणी | पुढारी

महामार्गावरील 24 तास गस्त बंद करू नका ; वाहनचालकांकडून मागणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे आणि जुन्या महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी, परिवहन विभागाकडून 24 तास गस्त ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. परंतु, ही मोहीम आता बंद करण्यात येत आहे. मात्र, ही मोहीम कायमस्वरूपी सुरू ठेवा, अशी मागणी वाहनचालकांकडून जोर धरत आहे. परिवहन विभागाकडून राज्यातील 50 आरटीओ कार्यालयांतील 12 पथकांमार्फत 24 तास गस्तीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला गेला होता. त्यानुसार विविध कार्यालयांतील पथके दोन्ही महामार्गांवर गस्त घालत होती.

त्याकरिता आराखडा बनविला होता. यामुळे परिवहन विभागाला अपघात रोखण्यास काही प्रमाणात यश आले होते. 1 जुलैपासून ही 24 तास गस्तीची मोहीम परिवहन विभाग बंद करणार आहे. परंतु, ही मोहीम सुरूच ठेवावी, अशी मागणी होत आहे.
महामार्ग पोलिस आणि आरटीओची पथके येथे सातत्याने कार्यरत असल्याने वाहनचालकांना शिस्त लागली होती. मात्र, परिवहन विभाग ही मोहीम बंद करत आहे, हे चुकीचे आहे. ही मोहीम कायमस्वरूपी सुरू ठेवावी, असे वाहनचालक सिध्देश वाघ, वाहनचालक यांनी म्हटले आहे.

पुणे-मुंबई जुन्या आणि नव्या महामार्गांवर आरटीओच्या वायुवेग पथकांची 24 तास गस्त नसेल. मात्र, येथे पुणे, मुंबई, पनवेल आणि पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक वायुवेग पथके कार्यरत केली जातील.
– भरत कळसकर, राज्य परिवहन उपायुक्त, रस्तासुरक्षा कक्ष, परिवहन विभाग 

हे ही वाचा : 

सांगली काँग्रेस रिचार्ज; महाराष्ट्र-कर्नाटकचे कार्यकर्ते जोशात

मराठी साहित्य संमेलन : 2 फेब्रुवारीपासून अमळनेर येथे भरणार सारस्वतांचा मेळा

Back to top button