पुण्यात रंगमंदिरात साकारतेय बालगंधर्वांचे शिल्प ; जन्मदिनानिमित्त होणार अनावरण | पुढारी

पुण्यात रंगमंदिरात साकारतेय बालगंधर्वांचे शिल्प ; जन्मदिनानिमित्त होणार अनावरण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आपण कोणीही बालगंधर्वांना प्रत्यक्ष पाहिलेले नाही. पण, चक्क बालगंधर्वांना भेटल्याची अनुभूती आपल्याला एखाद्या शिल्पातून मिळाली तर…रसिकांना खूप आनंद होईल ना… ही संधी आता बालगंधर्व रंगमंदिरामध्ये मिळणार आहे. बालगंधर्व यांच्या सोमवारी (दि. 26) साजर्‍या होणार्‍या जन्मदिनानिमित्त शिल्पकार सुरेश राऊत हे शाडूमातीतील दोन शिल्पं तयार करत असून, ही शिल्पं पाहून प्रत्यक्ष बालगंधर्वच आपल्यासमोर उभे असल्याची अनुभूती मिळेल. पुरुष भूमिकेतील आणि स्त्री भूमिकेतील बालगंधर्व यांचे शिल्प राऊत साकारत असून, त्याला रसिकांकडून पसंतीची पावतीही मिळत आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी- गायक नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचा जन्मदिन आणि बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापदिनानिमित्त 26 ते 28 जून दरम्यान तीन दिवसांच्या महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यासाठी राऊत हे बालगंधर्व यांची शाडूच्या मातीची दोन शिल्पं साकारत आहेत. राऊत हे गेल्या चार ते पाच दिवसांपासून बालगंधर्व रंगमंदिरात ही शिल्पं मेहनतीने तयार करत असून, ते बालगंधर्वांना अगदी हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न आपल्या कलाकारीतून करत आहेत. आपल्या मेहनतीने आणि कौशल्याने ते हे शिल्प तयार करत असून, हे शिल्प पाहून आपल्याला प्रत्यक्ष बालगंधर्वच समोर उभे असल्यासारखे वाटेल.

बालगंधर्व रंगमंदिरात असलेले छायाचित्र पाहून मी हे शाडू मातीचे शिल्प हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न करत आहे. सोमवारपर्यंत ही दोन्ही शिल्पं तयार होतील. वर्ल्ड आर्टिस्ट डेव्हलमेंट संघटना, कलाकार कट्टा आणि पुणे आर्ट प्लाझा यांच्या वतीने मी हे शिल्प बनवित आहे. बालगंधर्व यांचे शिल्प तयार करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे. ही संधी मिळाल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.
                                                                       – सुरेश राऊत, शिल्पकार. 

हे ही वाचा : 

Paralysis : पस्तीशीत गाठतोय पक्षाघात; वेळीच सावध होणे गरजेचे

सातारा : माऊलींना जिल्ह्याचा भक्तिमय निरोप

Back to top button