सातारा : माऊलींना जिल्ह्याचा भक्तिमय निरोप

सातारा : माऊलींना जिल्ह्याचा भक्तिमय निरोप

Published on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : गेल्या रविवारपासून सातारा जिल्ह्यात टाळ-मृदंग व हरिनामाचा जयघोष करत व लाखो वारकरी व भाविकांसह पंढरपूरकडे निघालेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पाच दिवस मुक्कामी होता. जिल्ह्यातील बरड येथील अखेरचा मुक्काम आटोपून पालखी सोहळ्याने शुक्रवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी सातारा जिल्हावासीयांनी माऊलींना भक्तिमय वातावरणात निरोप दिला.

माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आळंदी येथून दि. 10 जून रोजी प्रस्थान झाले असून गुरुवार, दि. 29 जुलै रोजी आषाढी एकादशी दिवशी हा सोहळा पंढरपूर येथे पोहोचणार आहे. आळंदी ते पंढरपूर असा या पालखी सोहळ्याचा प्रवास असून हा पालखी सोहळा रविवार, दि. 18 जून रोजी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात आला. तत्पूर्वी प्रथम नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना दत्त घाटावर स्नान घालण्यात आले. त्यानंतर दुपारी 4 वाजता हा पालखी सोहळा लोणंदच्या पालखी स्थळावर स्थिरावला. लोणंद येथे दोन दिवसांचा मुक्काम आटोपल्यावर मंगळवार, दि. 20 रोजी चांदोबाचा लिंब येथे उभा रिंगण सोहळा झाला. हा सोहळा म्हणजे भाविकांसाठी 'याचि देही याचि डोळा' असा होता. हा रिंगण सोहळा झाल्यानंतर माऊलींची पालखी तरडगाव येथे एक दिवसाच्या मुक्कामासाठी विसावली. बुधवार, दि. 21 जून रोजी तरडगावचा मुक्काम आटोपून हा पालखी सोहळा काळज, सुरवडी, वडजल, निंभोरे गावामार्गे सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास फलटणनगरीत आला. फलटणमधील प्रशस्त पालखी तळ (विमानतळ) येथे एक दिवसासाठी हा सोहळा विसावला. गुरुवार, दि. 22 जून रोजी फलटण येथील एक दिवसाचा मुक्काम आटोपून या पालखी सोहळ्याने बरडकडे प्रस्थान केले. दरम्यान, विडणी येथे सकाळी 9 वाजता माऊलींच्या पालखी सोहळ्याचे ग्रामस्थांनी स्वागत केले. त्यानंतर पिंप्रद येथे दुपारी माऊलींच्या पादुकांना अभिषेक घालण्यात आला. तसेच नैवेद्य दाखवून हरिनामाचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर हा सोहळा पुढे निंबळक (वाजेगाव) येथे थांबून नंतर सायंकाळी 7 च्या सुमारास मुक्कामासाठी बरडगाव येथे विसावला. बरड येथेही मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. शुक्रवार दि. 23 जून रोजी बरड येथील तसेच सातारा जिल्ह्यातील अखेरचा मुक्काम आटपून माऊलींच्या पालखी सोहळ्याने सकाळी 9 वाजता सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी सातारा जिल्हावासियांनी पालखी सोहळ्यास सातारा-सोलापूर जिल्ह्याच्या सिमेवर (धर्मपूरी) येथे भक्तीमय वातावरणात निरोप दिला.

दरम्यान, धर्मपुरी येथे सातारा जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी डुडी यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्याकडे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी हस्तांतरीत केली. यावेळी सातारचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, सोलापूरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सोलापूरचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे उपस्थित होते.

माऊलींच्या पालखीचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले सारथ्य

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी राजुरी पासून ते सोलापूर जिल्ह्याच्या सीमेपर्यंत माऊलींच्या रथाचे सारथ्य केले. हरी नामाचा गजर करत पालखीला जिल्हा प्रशासनाकडून निरोप देण्यात आला. दरम्यान, सोहळा प्रमुख अ‍ॅड. विकास ढगे पाटील यांनी प्रशासनाने चांगल्या प्रकारे सहकार्य व सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल सातारा जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news