पुणे : उत्तम प्रशासनासह दर्जेदार शिक्षण हेच उद्दिष्ट ! पार पडली जी-20 शिक्षणमंत्र्यांची बैठक | पुढारी

पुणे : उत्तम प्रशासनासह दर्जेदार शिक्षण हेच उद्दिष्ट ! पार पडली जी-20 शिक्षणमंत्र्यांची बैठक

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शिक्षणात ई-लर्निंगच्या पद्धतींचा अभिनव वापर करणे गरजेचे आहे आणि उत्तम प्रशासनासह, दर्जेदार शिक्षण देणे, हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. जी-20 शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीला ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून संबोधित करताना त्यांनी हे मत मांडले. मोदी म्हणाले, ‘भारताने आता सर्वसमावेशक आणि सर्वांगीण शिक्षणाच्या प्रवासाकडे वाटचाल सुरू केली आहे. पायाभूत साक्षरता किंवा अक्षरओळख, युवकांचा पाया मजबूत करणारी असते आणि भारत त्याला आता तंत्रज्ञानाचीही जोड देत आहे.‘ केंद्र सरकारच्या ’अर्थ समजून वाचन करणे तसेच संख्याशास्त्र या दोन्हीमधील निपुणता वाढवण्यासाठीचा राष्ट्रीय उपक्रम’ किंवा ’निपुण भारत’ अभियानाचा त्यांनी उल्लेख केला आणि जी-20 देशांनीदेखील, ‘पायाभूत साक्षरता आणि अंकओळख’ हीच प्राथमिकता असण्यावर शिक्कामोर्तब केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

ज्ञानाच्या देवघेवीसाठी डिजिटल पायाभूत सुविधा किंवा दीक्षा पोर्टलचाही त्यांनी उल्लेख केला. या पोर्टलचे उद्दिष्ट, दूरस्थ पद्धतीने शालेय शिक्षण देणे हे आहे. या पोर्टलवरून 29 भारतीय आणि सात परदेशी भाषांमधून शिक्षण दिले जाते, असे सांगत, आजवर त्यावरून 137 दशलक्ष लोकांनी अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. इतर देशांना, विशेषतः ग्लोबल साऊथ देशांना, आपले अनुभव, ज्ञान आणि संसाधने यांची मदत देण्यास भारत आनंदाने तयार आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

आपल्या युवकांना सतत कौशल्य, नव्याने कौशल्य प्रशिक्षण आणि कौशल्य अद्यायावत करून भविष्यासाठी सज्ज बनवण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. जी-20 शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला की या गटाने शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हरित संक्रमण, डिजिटल परिवर्तन आणि महिला सक्षमीकरण यांना चालना दिली आहे. शिक्षण हे या सर्व प्रयत्नांचे मूळ आहे. सर्वसमावेशक, कृती-केंद्रित आणि भविष्यासाठी सज्ज शिक्षणाचा अजेंडा ही बैठकीची फलनिष्पत्ती असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘वसुधैव कुटुंबकम – एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य’ या भावनेतून संपूर्ण जगाला याचा फायदा होईल, असे सांगत पंतप्रधानांनी समारोप केला.

हे ही वाचा : 

राधानगरीसह काळम्मावाडी धरण क्षेत्रात पावसाची सलामी 

गहू, तूर, उडीद डाळ साठेबाजीवर निर्बंध

Back to top button