गहू, तूर, उडीद डाळ साठेबाजीवर निर्बंध | पुढारी

गहू, तूर, उडीद डाळ साठेबाजीवर निर्बंध

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गहू तसेच तूर व उडीद डाळीच्या साठेबाजीवर निर्बंध लागू केले आहेत. याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी गुरुवारी दिला.

तूर आणि उडीद डाळीवरील साठ्याचे निर्बंध 30 ऑक्टोबरपर्यंत तर गव्हाच्या साठ्यावरील निर्बंध 31 मार्च 2024 पर्यंत लागू राहणार आहेत. घाऊक व्यापार्‍यांना प्रत्येक तूर व उडीद डाळीसाठी 200 मेट्रिक टनपर्यंत तर किरकोळ व्यापार्‍याला 5 मेट्रिक टन आणि बिग चेन रिटेलर्सना प्रत्येक डाळीसाठी प्रत्येक आऊटलेटसाठी 5 मेट्रिक टन व डेपोसाठी 200 मेट्रिक टन साठा करून ठेवता येणार आहे. मिलर्स आणि आयातदारांनाही मर्यादा ठरवून दिली आहे. केंद्र शासनाच्या पोर्टलवर डाळीचा साठा नियमितपणे प्रसिद्ध करणे बंधनकारक राहील, असेही चव्हाण यांनी सांगितले.

घाऊक व्यापार्‍यांना गव्हाचा 3 हजार मेट्रिक टन तर किरकोळ व्यापार्‍यांना व बिन चेन रिटेलर्सना प्रत्येक किरकोळ आऊटलेटसाठी 10 टन व डेपोसाठी 3 हजार टन साठा करता येणार आहे. प्रक्रिया करणार्‍या उद्योगांनाही साठा निश्चित केला आहे.

Back to top button