पिंपरी : एमआयडीसी कॉलनीत पक्ष्यांचा अधिवास होतोय नष्ट | पुढारी

पिंपरी : एमआयडीसी कॉलनीत पक्ष्यांचा अधिवास होतोय नष्ट

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : प्रशासनाचा कागदी घोडे नाचविण्याचा कारभार आणि बेगडी पर्यावरणरक्षण कसे असते, याचा अनुभव चिंचवड येथील नागरिक घेत आहेत. एकेकाळी गर्द झाडी, खळखळता ओढा, मोठ्या प्रमाणात असणारा पक्ष्यांचा अधिवास म्हणून लौकिक असणार्‍या चिंचवड-बिजलीनगर येथील एमआयडीसी कॉलनी परिसरात आता वीसपेक्षा अधिक पक्ष्यांचा अधिवास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याचप्रमाणे, या ठिकाणी होत असलेल्या वृक्षतोडीमुळे परिसरातील मोठा हरितपट्टा आता नाहीसा होत चालला आहे.

त्यामुळे परिसरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी, पक्षीप्रेमी यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे. एका बाजूला ओढ्याची हद्द, दुसर्‍या बाजूला रेल्वे ट्रॅक, त्याचप्रमाणे, एमआयडीसी कॉलनीची संरक्षक भिंत यामुळे या परिसरात गेल्या 40 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वृक्षसंपदा निर्मित होऊन छोटा बायोडायव्हर्सिटी पार्क तयार झाला होता. त्यामुळे 20 पेक्षा जास्त पक्षी या परिसरात दिसून येत होते. परंतु गेल्या काही महिन्यांपासून होत असलेली झाडांची नियोजनबद्ध कत्तल आणि जिवंत झाडे जाळण्याचा प्रकार यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा नष्ट झालेली दिसून येत आहे.

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागाच्या एक गटाने समितीचे अध्यक्ष व पर्यावरण अभ्यासक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत निरीक्षण केले. विजय मुनोत, विजय जगताप, संतोष चव्हाण, विशाल शेवाळे, गौरी सरोदे, विभावरी इंगळे यांनी त्यामध्ये सहभाग घेतला. अभ्यास गटाने केलेल्या निरीक्षणात ही गंभीर बाब उजेडात आली आहे.

पाटील म्हणाले, सकाळी व सायंकाळच्या वेळी नेहमी दिसून येणारी काळी शराटी, तिची असणारी तपकिरी बाकदार चोच, माथ्यावर चटकदार लाल रंगाची टोपी, विटकरी लाल रंगाचे पाय, डौलदार चाल आता भविष्यात नजरेस पडणार नाही. राखी धनेश, विविधरंगी चिमण्या,पोपट, बगळे, घार, साळुंकी, टिटवी, ढोकरी, करकोचा, पाणकोंबडी, कोकीळ, पावशा, भारद्वाज, गव्हाणी घुबड, धीवर(खंड्या), बुलबुल, सुगरण, कोतवाल यांच्यासह वीसपेक्षा जास्त पक्ष्यांचा अधिवास आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

हरितपट्टा होतोय गायब

एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष, विकासाचे़ चुकीचे नियोजन आणि नियमबाह्य वृक्षतोड यामुळे बिजलीनगर-एमआयडीसी कॉलनी परिसरातील मोठा हरितपट्टा आता गायब झाला आहे. हा सर्व प्रकार तातडीने थांबविणे आवश्यक आहे. तसेच, याबाबत दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विजय पाटील यांनी केली आहे.

बिजलीनगर येथील एमआयडीसी कॉलनी परिसरात झाडांची होत असलेली नियोजनबद्ध कत्तल आणि झाडे जाळून त्यांची लावण्यात येत असलेली विल्हेवाट याचे प्रत्यक्ष पुरावे आम्ही जमा केले आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करणे क्रमप्राप्त ठरते. भारतीय वनसंरक्षण कायदा तसेच महाराष्ट्र वनसंरक्षक कायद्याचे या प्रकारांमुळे उल्लंघन झालेले आहे.

– विजय पाटील, पर्यावरण अभ्यासक.

चिंचवड-बिजलीनगर येथील एमआयडीसी कॉलनी परिसरातील झाडे तोडण्यासाठी एमआयडीसीने परवानगी दिली आहे का, याची तपासणी केली जात आहे. महापालिका उद्यान विभागाने त्यासाठी परवानगी दिलेली नाही. तेथील जागेत नव्याने काही झाडे लावण्याबाबत आपण नियोजन करीत आहोत.

– राजेश वसावे, प्रभारी सहाय्यक उद्यान अधीक्षक.

हेही वाचा

Ashadhi wari 2023 : इंदापुरात संत तुकोबारायांच्या अश्वाचे दुसरे गोल रिंगण उत्साहात

पिंपरी : महापालिका संकेतस्थळावरुन ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय गायब

जळगाव : गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवालदाराने घेतली लाच

Back to top button