पिंपरी : महापालिका संकेतस्थळावरुन ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय गायब | पुढारी

पिंपरी : महापालिका संकेतस्थळावरुन ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय गायब

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महापालिकेची 8 क्षेत्रीय कार्यालये आहेत. मात्र, महापालिकेच्या संकेतस्थळावर ’ह’ क्षेत्रीय कार्यालयाबाबतची माहिती गायब आहे. त्यामुळे हे कार्यालय अस्तित्वात नाही, असा संदेश संकेतस्थळातून दिला जात आहे. तसेच, ’ग’ क्षेत्रीय कार्यालयास क्षेत्रीय अधिकारीच नाही, असे त्यात म्हटले आहे.

महापालिकेचे विविध विभाग आणि त्यांच्या अधिकार्‍यांची माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी म्हणून महापालिकेने ुुु. लिालळपवळर. र्सेीं. ळप हे अधिकृत संकेतस्थळ तयार केले आहे. त्यावर ताजी व अधिकृत माहिती असते, असा शहरवासीयांचा समज आहे. त्यावरील माहिती अपडेट करण्यासाठी महापालिका दरवर्षी कोट्यवधीचा खर्च करते, असे असताना संकेतस्थळावर अनेकदा माहिती ही जुनी व कालबाह्य असते.नवीन अधिकारी आले तरी, जुन्याच अधिकार्‍यांचे नाव असणे, संपर्क क्रमांक दुसर्‍याच अधिकार्‍यांचे देणे असे प्रकार वारंवार घडले आहेत.

संकेतस्थळावर महापालिका शीर्षकावर क्लिक केल्यास विभाग हे उपशीर्षक येते. त्यामध्ये महापालिकेच्या सर्व विभागांची यादी दिली आहे. त्यातच क्षेत्रीय कार्यालये आहेत. शहरात अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह असे आठ क्षेत्रीय कार्यालय आहेत. मात्र, संकेतस्थळावर कासारवाडी येथील ह क्षेत्रीय कार्यालयाची माहितीच देण्यात आलेली नाही.

तेथील क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे हे आहेत. तर, थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी, संपर्क क्रमांक आदी माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे क्षेत्रीय अधिकारी कोण आहे, हे नागरिकांना समजत नाही. क्षेत्रीय अधिकारी म्हणून शीतल वाकडे या अनेक महिन्यांपासून काम पाहत आहेत. मात्र, नागरिकांना संकेतस्थळावर अधिकार्‍यांची माहिती मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

हेही वाचा

पिंपरी-चिंचवड महापालिकेची नवी इमारत तब्बल 400 कोटींची

पिंपरी-चिंचवडला पर्यावरणपूरक आदर्श शहर करण्याचे नियोजन

Ashadhi wari 2023 : इंदापुरात संत तुकोबारायांच्या अश्वाचे दुसरे गोल रिंगण उत्साहात

 

Back to top button