

इंदापूर : जावेद मुलाणी :
भेटी लागे पंढरीनाथा!जीवा लागली तळमळ व्यथा!!
कधी कृपा करसि नेणे! मज दिनाचे धावणे!!
शिणले माझे मन! वाट पाहते लोचन !! तुका म्हणे भूक! तुझे पहावया मुख!!
ही भावना मनात ठेवून कपाळी बुक्का आणि भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णवांचा मेळा संत तुकाराम महाराज यांच्या अभंग ओळी नुसार श्रीक्षेत्र देहूपासून निघालेला वैष्णवांचा मेळा हरीचे नाम घेत आनंदाच्या डोहात बुडुन इंदापूर शहरात मोठ्या उत्साहात दाखल झाल्यानंतर सोहळ्यातील मानाचे दुसरे गोल रिंगण पार पडले.
नगारखाना प्रदक्षिणा झाल्यानंतर अश्वाची रिंगण पाहणी आणि त्यांनंतर भगवे पथकाचे झेंडेकरी, विणेकरी धावल्यानंतर हंडेकरी व तुळशीवाल्या भगिनी, पखवाजवाले धावले. सुरुवातीला मानाच्या आणि अकलूजच्या मोहिते पाटील यांच्या अश्वाने प्रदक्षिणा पूर्ण करून दोन्हीही अश्वांच्या परिक्रमाने लक्ष लक्ष नयनांचे पारणे फेडले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा विरश्री मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंद्रेश्वरांच्या इंदापूर नगरीत जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा गुरुवारी (दि. २२) १२ वाजता पावसाच्या हलक्या सरी झेलत रयत शिक्षण संस्थेच्या कै. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात दाखल झाला.
या रिंगण सोहळ्यास खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, पुणे जिल्हा परिषद माजी सदस्या अंकिता पाटील ठाकरे, निहार ठाकरे, राजवर्धन पाटील, भरत शहा, विठ्ठल ननवरे, पोपट शिंदे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, शहरातील नागरीक आदी उपस्थित होते.
इंदापूर नगरपालिकेने याही वर्षी अंत्यत चांगल्या पद्धतीने शहरात भव्य स्वागत कमानी उभारुन तसेच वीज, पाणी, रस्ते, स्वच्छता, रिंगणस्थळी सुशोभीकरण अशी सर्व जय्यत जोरदार तयारी केली होती.
पंढरीच्या सुखा अंत पार नाही लेखा !!
शेषा सहस्त्र मुखा न वर्ण वेची !!
पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी !!
जन्मोजन्मी वारी घडली तया !!
गुरुवारी सकाळी निमगांव केतकीत आरती झाल्यानंतर पालखी सोहळा निरोप देवून इंदापूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. इरिगेशन बंगला , हेगडेवस्ती, सोनमाथ्यावरिल चढ यंदा नसल्याने आनंदात सोनाई दुध संघावर संघाच्या वतीने सोनाई परिवाराकडुन वैष्णवांचे स्वागत करून त्यांना मसालेदार दुध, फराळ आदी सेवा देण्यात आल्या. पालखी सोहळा पुढे झगडेवाडी, तरंगवाडी मार्गस्थ होवून पालखी गोखळीच्या ओढ्यात न्याहारीसाठी विसावली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा येथील छोट्या गावकऱ्यांनी व नागरिकांनी फराळ नाश्टा देण्यात आला. सर्वांचे लक्ष लागले होते ते इंदापूरमधील एतिहासिक रिंगण सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे …. !
पंढरीची वारी आहे माझे घरी!
आणिक न करी तीर्थ व्रत !!
नाम विठोबाचे घेइन मी वाचे !
कल्पांतीचे तुका म्हणे !!
पालखी सोहळ्यातील वैष्णवांनी दिंडीकरांनी रिंगण प्रदक्षिणेस सुरुवात केली. पालखी सोहळ्यातील नगारा प्रदक्षिणा झाली आणि त्यानंतर भगवे झेंडेकरी, तुळशी वृंदावन,हांडे तुळस यांनी प्रदक्षिणा घातल्यानंतर बेलवाडीनंतर इंदापूरातही पोलिसांनी आरोग्य विभाग, महसुलच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी प्रदक्षिणा घातली. तसेच विणेकरी आणि पखवाजाचे हे पुंडलीका वरदे हरी विठ्ठल श्री न्यानदेव तुकाराम सह …. ज्ञानोबा तुकाराम…. ज्ञानोबा तुकाराम …माऊली… माऊली ..असा जयघोष करीत त्यांनी रिंगणाला नव चैतन्य आणले.
मानाच्या दोन्हीही अश्वानी वाऱ्याच्या वेगाने परिक्रमा पूर्ण केल्या. हे दृश्य हजारो उपस्थितांनी आपल्या नयनांनी अनुभवले. अश्वांच्या टापुची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी रिंगणाला लावलेल्या सरक्षंक काट्यांमधून धावा घेत एकच गर्दी केली व अश्वाच्या टापुंच्या माती कपाळी लावल्यानंतर धन्य धन्य झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. त्यानंतर मुख्य पालखीला टाळकरी, वारकऱ्यांनी भजन करीत फुगडी, झिम्मा खेळत मानवी मनोरे उभारत व शेवटी उडी घेऊन या अंत्यत प्रभावशाली एतिहासिक रिंगण सोहळ्याची सांगता झाली. वारकऱ्यांसह पोलिसांनी फुगडी खेळून या सोहळ्याचा आनंद साजरा केला.
सोहळ्यामध्ये शहरातील श्री समर्थ व्यायाम मंड्ळाचे मूकबधिर व मतिमंद निवासी शाळेमधील बालचमुनी प्रासंदिक दिंडी साकारुन विठ्ठल रुक्मिणी विणेकरी असे हुबेहूब साकारले होती. या अत्यंत देखण्या शाही रिंगण सोहळ्यास बारामतीचे अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोइटे, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, मुख्याधिकारी रामराजे कापरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांच्यासह सर्व शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या रिंगण सोहळ्याचे उत्कृष्ट समालोचन कैलास कदम यांनी केले.
रिंगण आटोपल्यानंतर पालखी सोहळा पहिल्यांदाच आयटीआयच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या भव्य शामियान्यात मुक्कामासाठी दाखल झाला. इंदापूर शहरात ठिकठिकाणी अन्नदान, भजन तसेच किर्तन आणि हरिपाठ सुरू असल्याने शहराला प्रति पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते.