प्रशासनाकडून माउलींच्या सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन ; शंभूराज देसाई यांचे प्रतिपादन | पुढारी

प्रशासनाकडून माउलींच्या सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन ; शंभूराज देसाई यांचे प्रतिपादन

निरा  : पुढारी वृत्तसेवा :  सातारा जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर वारकर्‍यांसाठी गतवर्षापेक्षा दुपटीने आरोग्य पथके, पिण्याचे पाण्याच्या टँकरची व्यवस्था, शौचालय, दोन मोबाईल कार्डियाक रुग्णवाहिका, प्रत्येक दोन किलोमीटरवर स्थायी आरोग्य केंद्र, तातडीच्या उपचारासाठी दुचाकीवर पंचेचाळीस फिरत्या डॉक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाकडून वारीचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आल्याची माहिती साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. निरा नदीच्या तीरावर माउलींच्या पादुकांना रविवारी (दि. 18) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास निरास्नान घालण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर माउलींच्या सोहळ्यातील वारकर्‍यांना देण्यात येणा-या सुविधांची पाहणी, निरास्नानाच्या तयारीची पाहणी, तसेच सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाडेगाव (ता. खंडाळा) येथे उभारण्यात येणा-या स्वागतकक्षाची पाहणी शंभूराज देसाई यांनी गुरुवारी (दि. 15) दुपारी केली. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र जुडी, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, श्री दत्तसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रदीप काकडे, पुरुषोत्तम जाधव, खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील, नायब तहसीलदार चेतन मोरे, लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर आदी उपस्थित होते.

या वेळी पाडेगावच्या सरपंच अनिता मर्दाने, उपसरपंच संतोष माने यांनी शंभूराज देसाईंचे स्वागत केले. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय धायगुडे, माजी उपसरपंच रघुनाथ धायगुडे, यांनी शंभूराज देसाई यांना निरास्नानाच्या तयारीची माहिती दिली. पाडेगाव ग्रामपंचायतीला पालखी सोहळा अनुदानाची रक्कम चार लाख रुपये द्यावी, अशी मागणी केली. या वेळी शंकरराव मर्दाने, गजानन माने, ग्रामसेविका साधना जाधव आदी उपस्थित होते.

हे हे वाचा : 

Ashadhi Wari 2023 : यवत येथे हजार किलो पिठलं अन् 60 हजार भाकरी ; वारकर्‍यांच्या भोजनाची खास व्यवस्था

Ashadhi wari : विठुरायाच्या गजरात शहरातील वारकरी तल्लीन

Back to top button