धक्कादायक ! सुशिक्षित बेरोजगार गाइडना मानसिक त्रास देत ठेवले डांबून… | पुढारी

धक्कादायक ! सुशिक्षित बेरोजगार गाइडना मानसिक त्रास देत ठेवले डांबून...

भिगवण (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  चार महिन्यांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी कुंभारगाव येथे पर्यटनाबाबत घेतलेल्या बैठकीत गाइडचे काम करणार्‍या सुशिक्षित बेरोजगार युवकांना वन विभागाने तत्काळ प्रशिक्षण व ओळखपत्र देण्याच्या सूचना केली होती. मात्र, त्यांच्या बारामती तालुक्यातच खा. सुळेंच्या सूचनांना हरताळ फासण्याचे काम वन अधिकारी करीत असून, तीन दिवसांपासून कुंभारगावच्या काही गाइड तरुणांना या अधिकार्‍यांनी मानसिक त्रास तर दिलाच, शिवाय गुरुवारी ताब्यात घेतलेल्या चार गाइड तरुणांना अक्षरशः डांबून ठेण्याचा प्रकार घडला.

गुरुवारी (दि. 15) उमेश सल्ले, राहुल काळे, शंकर नगरे आणि अभिषेक लोंढे या चार गाइड तरुणांना बारामतीच्या वन अधिकार्‍यांनी बोलावून घेत सायंकाळी सहा वाजेपर्यंत सोडले नव्हते. याबाबत आमदार दत्तात्रय भरणे यांनीही फोन करून संबंधित मुलांना सोडण्याच्या सूचना केल्या. परंतु, त्यांच्याही सूचना वार्‍यावर सोडल्याने अधिकारी एवढे मग्रूर कसे वागतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर, सांगली पूरस्थितीत मदत करणार्‍यांत या मुलांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्या युवकांना हालअपेष्टा आज वाट्याला आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत थोडक्यात माहिती अशी की, उजनी जलाशयात राज्यभरातून पक्षी पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. या पर्यटकांना या भागातील इंदापूर, बारामती, कर्जत, सासवड या भागांतील वनपरिक्षेत्रात प्राणी-पक्षी पाहण्यासाठी या भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक गेल्या काही वर्षांपासून गाइडचे काम करतात. यातून या धरणग्रस्त बेरोजगारांना रोजगार उपलब्ध
झाला आहे.

शिर्सुफळ गाडीखेल परिसरात वन्य प्राण्यांची शिकार होत असल्याच्या तक्रारी आल्यावर त्या परिसरात गस्त घालताना पथकाला संशयित म्हणून आल्यावर फक्त चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. चौकशी केल्यावर सूचना देऊन व वन्य कायद्याची माहिती देऊन लगेच जाण्यास सांगितले. कारण यामध्ये कोणतीही सत्यता नव्हती.
                                              – शुभांगी लोणकर, वनपरीक्षेत्र अधिकारी, बारामती 

हे ही वाचा 

पुणे : चोरट्यांमध्येही क्रेझ आरएक्स हण्ड्रेड दुचाकींची

पुणे : शिबिरात केवळ 15 पुरुषांची नसबंदी

Back to top button