भारतातील 100 टक्के शाकाहारी गाव! | पुढारी

भारतातील 100 टक्के शाकाहारी गाव!

गया : भारतामध्ये एक गाव असे आहे, जेथे सर्वच ग्रामस्थ अगदी 100 टक्के शुद्ध शाकाहारी आहेत. याठिकाणी मांसाहार व मद्यपान सेवन करण्यास पूर्णपणे मनाई आहे. हे गाव बिहारच्या गया जिल्ह्यातील वजीरगंज परिसरात आहे. या गावाचे नाव बिहिआइन असे आहे. या गावाला शाकाहारी गाव असेही म्हटले जाते. हे गाव संपूर्ण परिसरात प्रसिद्ध झालेले आहे.

एरवी, अशी अनेक गावे असतात, जेथे फक्त पूजा-अर्चना किंवा धार्मिक महिन्यांतच मांसाहार व मद्यपान वर्ज्य असते. मात्र, या गावात नेहमीच पूर्ण शाकाहाराचा पायंडा अतिशय कसोशीने पाळला जातो. या गावात ब्रह्मबाबाचे मंदिर आहे. त्यांच्या कोपामुळे आजपर्यंत येथील लोक मांसाहार व मद्यपानापासून सातत्याने दूर राहात आले आहेत, असे सांगितले जाते.

गया जिल्ह्यातील या वैष्णवी गावात 40 घरे आहे. प्रत्येक समाजातील लोक या ठिकाणी राहतात. यामध्ये बहुतांश राजपूत समाजाचा समावेश आहे. अनेक पिढ्यांपासून अत्यंत कठोरपणे या परंपरेचे पालन केले जात आहे. विशेष म्हणजे फक्त गावातील लोक या परंपरेचे पालन गावातच नाही, तर गावाबाहेरही करतात. ज्या-ज्याठिकाणी राहतात त्या सर्व ठिकाणी या परंपरेचे पालन केले जाते.

गावात नववधू आल्यावर तिलाही या परंपरेचे पालन करावे लागते. तिला विवाहापूर्वीच या परंपरेबाबत सांगितले जाते. गावकर्‍यांनी सांगितले की, अनेक वर्षांपूर्वी एका व्यक्तीच्या अंगात ब्रह्मबाबा आले होते. तसेच त्यांनी यावेळी अट ठेवली होती की, गावात मटण, मासे, दारू, कोणत्याही प्रकारचा मांसाहार बंद केल्यावरच मी गावात विराजमान होईल.

यानंतर सर्वांनी त्यांचे म्हणणे ऐकले आणि तेव्हापासून याचे पालन केले जात आहे. हेच या परंपरेमागील मुख्य कारण मानले जाते. गावात वसलेल्या ब्रह्मबाबांची ख्यातीही दूरदूरपर्यंत आहे. याठिकाणी लोक विवाह व इतर मनोकामना मागण्यासाठी येतात. गावात नवीन पीक काढल्यानंतर सर्वात आधी ब्रह्मबाबांना नैवेद्य दाखवला जातो, असेही स्थानिक सांगतात.

Back to top button