सिंहगडावर ई-बस कधी धावणार? पर्यावरणपूरक उपक्रम रखडलेलाच | पुढारी

सिंहगडावर ई-बस कधी धावणार? पर्यावरणपूरक उपक्रम रखडलेलाच

प्रसाद जगताप

पुणे : पीएमपी प्रशासनाने वन विभागाच्या सहकार्याने प्रवाशांची सोय व प्रदूषण रोखण्यासाठीचा एक भाग म्हणून ई-बससेवा प्रकल्प सुरू केला होता. मात्र, दीड वर्षापासून या प्रकल्पाला ब्रेक लागलेला आहे. प्रशासन हा उपक्रम पुन्हा सुरू कधी करणार? असा सवाल पर्यटक, प्रवासी व पर्यावरण संवर्धनाचे काम करणार्‍यांकडून विचारला जात आहे. विकेंडला सिंहगडावर जाणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी आहे. खासगी वाहनांच्या गर्दीमुळे घाट रस्त्यावर शनिवारी, रविवारी प्रचंड कोंडी होते.

लांबच्या लांब रांगा लागतात. या वेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने येथे छोट्या ई-बसमार्फत सुरू केलेला उपक्रम पुन्हा सुरू करण्याची आवश्यकता आहे. ‘सिंहगड ई-बससेवा’ या उपक्रमाला आता नवीन पीएमपीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते, सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी गती देणार का? काही दिवसांत समोर येईल.

3 लाखांपेक्षा अधिक मिळत होते उत्पन्न

सिंहगडावरील कोंडी लक्षात घेता उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार तत्कालीन वन अधिकारी, पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या कार्यकाळात सिंहगडावर पाहणी करण्यात आली. त्यानंतर नऊ मीटर लांबीच्या छोट्या 12 ई-बसमार्फत ‘सिंहगड पायथा (गोळेवाडी) ते किल्ले सिंहगड’ अशी बस सुरू करण्यात आली. त्या वेळी किल्ल्यावर जाणार्‍या सर्व खासगी वाहनांना बंदी करण्यात आली होती. फक्त पीएमपी बसमार्फतच सिंहगड किल्ल्यावर जाता येत होते. त्या वेळी विकेंडला दिवसभरात 200 पेक्षा अधिक फेर्‍या या बसमार्फत होत. त्याद्वारे सुमारे सात ते साडेसात हजार पर्यटक प्रवासी प्रवास करीत. त्यातून पीएमपीला विकेंडच्या दिवशी 3 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळत होते. ही सेवा पुन्हा सुरू झाल्यावर येथील कोंडी सुटणार असून, येथील पर्यावरण संवर्धनासोबत पशू-पक्ष्यांचा अधिवास सुरक्षित राहण्यास मदत होईल.

…म्हणून झाली सेवा बंद

सिंहगडावर सध्या खासगी वाहनसेवा सुरू आहे. ज्या पर्यटकांकडे वाहन उपलब्ध नाही, अशांना वडापची सेवा उपलब्ध आहे. पीएमपीची वातानुकूलित ई-बससेवा सुरू झाल्यामुळे येथील स्थानिक वडापचालकांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले होते. त्यामुळे वडापचालक नाराज होते. त्यामुळे बसगाड्यांवर दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. वडापचालकांसाठी दुसरे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून द्यावे. त्यानंतर बससेवा सुरू करण्यावर विचार व्हावा, असे स्थानिकांचे म्हणणे होते. दरम्यान, येथील घाट रस्त्यावर काही ठिकाणी बसगाड्या वळविण्यास अडचण येत होती. त्या ठिकाणी रस्तारुंदीकरण आणि घाट रस्त्यावर बसच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे, याचा विचार प्रशासनाकडून व्हावा, अशीही मागणी पुढे आली आहे.

टुरिस्ट डेपोचे काय?

सिंहगडावरील पर्यटनासाठी पुण्यातूनच थेट छोट्या 7 मीटर लांबीच्या बस सोडण्याचे नियोजन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्यासाठी महापालिकेच्या मदतीने 7 मीटर लांबीच्या 300 बस खरेदी केल्या जाणार होत्या. सारसबागेशेजारी असलेल्या छोट्या स्थानकातून या बस सोडल्या जाणार होत्या. येथे टुरिस्ट डेपो बनविण्याची संकल्पना होती. मात्र, तत्कालीन अध्यक्षांची बदली झाल्याने हा उपक्रमही बारगळला. आता या उपक्रमाला गती मिळणार का? असा सवाल केला जात आहे.

200 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर धूळ खात

पीएमपी प्रशासनाने येथे 12 ई-बस चार्जिंग करण्यासाठी महावितरणच्या मदतीने 200 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर आणि बसगाड्यांच्या चार्जिंगसाठी चार्जिंग स्टेशनही उभारले होते. मात्र ‘सिंहगड ई-बससेवा’ बंद आहे. त्यामुळे 200 केव्हीचे ट्रान्सफॉर्मर व चार्जिंग स्टेशन धूळ खात पडून आहे.

सिंहगडावरील ई-बस सेवा पुरवताना पूर्वी येथे एका ई-बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ही बससेवा आता सुरू करता येईल, याची शक्यता वाटत नाही.

– सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

हेही वाचा

Back to top button