पुणे : कारागृहातील मोबाईल कनेक्शनचा गुन्हे शाखेकडून तपास | पुढारी

पुणे : कारागृहातील मोबाईल कनेक्शनचा गुन्हे शाखेकडून तपास

पुणेः पुढारी वृत्तसेवा :  कारागृहात छुप्या मार्गाने घेऊन गेलेल्या मोबाईलद्वारे झालेले कॉलिंगचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेने आता कंबर कसली आहे. सापडलेल्या मोबाईलद्वारे कारागृहातून बाहेर कोणाला संपर्क करण्यात आला याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
याप्रकरणी गेल्या दोन महिन्यात येरवडा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यांची गुन्हे शाखेच्या पथकाने संपूर्ण माहिती घेतली असून, कारागृह प्रशासनासोबतदेखील चर्चा केली आहे. येरवडा कारागृहात न्यायालयीन बंदी आणि शिक्षा लागलेले बंदिवान आहेत.

राज्यात सक्रिय असलेल्या अनेक गुन्हेगारी टोळ्या व त्यांचे टोळीप्रमुख यांची रवानगी स्थानिक कारागृहात न करता विविध कारागृहात करण्यात आली आहे. येरवडा कारागृहात सर्वच प्रकारचे बंदी आणि बंदिवान आहेत. त्या दृष्टीने सुरक्षाव्यवस्थादेखील चोख आहे. मात्र असे असताना चालू वर्षात दोन वेळा मोबाईल मिळून आले आहेत. या सर्व प्रकाराची कारागृह व पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. एप्रिल महिन्यात कारागृहातील एका बराकीच्या बाथरुमध्ये एक मोबाईल, तर मोबाईलचा दुसरा प्रकार मे महिन्यात आढळून आला. कारागृहातील सर्कल क्रमांक एक आणि बराक क्रमांक 1 येथील खिडकी नंबर दोन येथे रात्र पहारेकरी असलेल्या एका शिक्षाधीन बंदीला मोबाईलवर कोणीतरी बोलत असल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. आता गुन्हे शाखेकडून या गुन्ह्यांचा तपास करण्यात येतो आहे.

हे ही वाचा : 

Karnataka News | धक्कादायक! वाळू माफियांनी हेड कॉन्स्टेबलला ट्रॅक्टरखाली चिरडले

नाशिक मनपाच्या स्मार्ट स्कूलची पायलट क्लासरूम कार्यरत

Back to top button