Ashadhi Wari 2023 : सोपानकाकांची सासवडनगरी भक्तिरसात न्हाली ! | पुढारी

Ashadhi Wari 2023 : सोपानकाकांची सासवडनगरी भक्तिरसात न्हाली !

अमृत भांडवलकर : 

सासवड (पुणे ) : सोपानकाकांच्या सासवडनगरीत (ता. पुरंदर) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा बुधवारी (दि. 14) दोन दिवसांच्या मुक्कामासाठी विसावला. अवघ्या महाराष्ट्रातून आलेल्या लाखो वैष्णवांच्या या मेळ्याने ‘माउली माउली’नामाच्या अखंड जयघोषात सासवड शहर मंत्रमुग्ध झाले. दुसरीकडे श्री संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळ्याचेही आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व श्री संत सोपानकाका महाराज आणि श्री संत चांगावटेश्वर महाराज यांच्या पालखीदर्शनासाठी सासवडनगरीत लाखो भाविकांनी गर्दी केली होती.

माउलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी सासवडच्या पालखीतळावर तालुक्यातून भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. गुरुवारी (दि. 15) पहाटेपासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी (दि. 16) पहाटे पालखी सोहळा जेजुरीनगरीत पुढील मुक्कामासाठी जाणार आहे. दरम्यान, पहाटे 5 वाजता सासवड नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी निखिल मोरे, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांच्या उपस्थितीत पालखीतळावर माउलींच्या पादुकांची पूजा करण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येने वारकरी तसेच पुरंदरवासीय उपस्थित होते. दरम्यान, उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

माउलींच्या सोहळ्यात 427 दिंड्या सहभागी
वारकर्‍यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात टाळ-मृदंग आणि मुखाने ‘ज्ञानोबा तुकाराम’चा जयघोष करीत सासवडनगरी भक्तिरसात न्हाली होती. या माउलींच्या सोहळ्यात 427 दिंड्या सहभागी झाल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख अ‍ॅड. विकास ढगे यांनी दिली.

हे ही वाचा : 

पुणे शहरातील पाणीपुरवठ्याच्या सतराशे तक्रारी

पुणे : लोहगावला जाण्यासाठी तीन रस्त्यांचे पर्याय

Back to top button