

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोहगावला जाणारा अस्तित्वातील रस्ता बंद होणार असल्याने त्याऐवजी नव्याने दोन ते तीन रस्त्यांचा पर्याय पुढे आला आहे. महापालिका आणि हवाईदलाच्या अधिकार्यांच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणानंतर त्यामधील एक रस्ता निश्चित करून त्यानुसार अंतिम प्रस्ताव सादर केला जाणार आहे. पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्यात येणार असून, त्यासाठी वेकफिल्डपासून लोहगावकडे जाणारा अस्तित्वात असलेला रस्ता बंद करण्याचा निर्णय बुधवारी महापालिका आणि हवाईदलाच्या अधिकार्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता.
दरम्यान, विमाननगर आणि येरवडा परिसरातून लोहगावला जाण्यासाठी विमानतळाशेजारून जाणारा अस्तित्वातील रस्ता हाच सध्या एकमेव पर्याय आहे. त्यामुळे या रस्त्याला पर्यायी रस्ता आखून तो विकसित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यानुसार गुरुवारी महापालिका आणि हवाईदलाच्या अधिकार्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. त्यानंतर झालेल्या बैठकीला हवाईदलाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी मनोज पिसे, ग्रुप कॅप्टन मनोज गेरा, विंग कमांडर पी. सजनी, गॅरिसन इंजिनिअर्सचे के. स्वामी, पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पथप्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, उपायुक्त प्रतिभा पाटील, महेश पाटील हे उपस्थित होते.
फ
या पर्यायी रस्त्याबद्दल झाली चर्चा
पर्याय क्र- 1 : फाइव्ह नाइन चौक ते गॅरिसन इंजिनिअर्स ऑफिस जागेतून पुढे बर्माशेल झोपड़पट्टीच्या बाजूने हवाईदलाच्या जागेला वळसा घालून दगड खाणीपासून पुढे कलवडवस्तीला अस्तित्वातील रस्त्याला जोडणे.
पर्याय क्र.2 : वेकफिल्ड चौक ते केंद्रीय विद्यालय व राडार ऑफिसच्या मधून रस्ता तयार करणे.
पर्याय क्र. 3 : एलिव्हेटेड रस्ता विकसित करणे (हा पर्याय जास्त खर्चीक असल्याने तो व्यवहार्य नसल्याची चर्चा या वेळी झाली.)
बर्माशेल झोपडपट्टीवासीयांना दिलासा
विमातळापासून लोहगावला जाणारा रस्ता बंद होणार असल्याने फाइव्ह नाइन चौकातून बर्माशेल झोपडपट्टीतून रस्ता प्रस्तावित होता. मात्र, आमदार सुनील टिंगरे यांनी बर्माशेल झोपडपट्टीतून रस्ता न करता तो संरक्षण विभागाच्या जागेतून करावा, अशी आग्रही भूमिका घेतली होती. त्यानुसार प्रशासनाने बर्माशेलमधून रस्त्याचे पर्याय न सुचविता अन्य मार्गांचे पर्याय सुचविले आहेत. त्यामुळे बर्माशेलवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा :