धनकवडी : रस्त्यांवरील अडथळ्यांच्या शर्यतीमुळे नागरिक त्रस्त | पुढारी

धनकवडी : रस्त्यांवरील अडथळ्यांच्या शर्यतीमुळे नागरिक त्रस्त

धनकवडी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : धनकवडी, आंबेगाव पठार परिसरातील अंतर्गत रस्त्यांवरील अनेक गतिरोधक अशास्त्रीय पद्धतीने बसवले आहेत. यामुळे दुचाकीचालकांना त्रास सहन करावा लागत असून, काहींना मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. तसेच, या गतिरोधकांमुळे अपघातांचाही धोका निर्माण झाला आहे. परिसरातील गतिरोधकांवर काही ठिकाणी पांढरे पट्टे मारलेले नाहीत, तर काही ठिकाणी पांढरे पट्टे स्पष्टपणे दिसत नाहीत.

तसेच या गतीरोधकांची उंची कमी, जास्त असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. यामुळे छोटे, मोठे अपघात होत आहेत. आंबेगाव पठार परिसरातील राजे चौक, गल्ली नंबर पाचमधील रस्त्यावरील सिमेंटचे गतिरोधक वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहेत. यामुळे प्रशासनाने परिसरात शास्त्रीय पद्धतीचे गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. धनकवडी परिसरातील मोहननगरमधील कै. अंबादास इंदापूरकर मार्गावर टाकलेल्या रंबलर्स सध्या दुरवस्था झाली आहे. त्यातील उघड्यावर आलेल्या खिळ्यांमुळे वाहनांने पंक्चर होत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले.

सांडपाणी वाहिनी तुंबल्याने गैरसोय

बी. टी. कवडे रोड येथील पवार बागेसमोर सांडपाणी वाहिनी तुंबल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत होते. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे घोरपडी परिसरातील रस्त्यांवर जागोजागी पाणी साचले आहे. त्यातच आता पवार बाग परिसरातील मुख्य रस्त्यावरील सांडपाणी वाहिनी तुंबली आहे. यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत आहे.

पावसाळा सुरू होण्याअगोदरच ही अवस्था असेल, तर पाऊस पडल्यानंतर काय स्थिती होईल, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्यावर पावसाचे पाणी साचून नये, यासाठी महापालिकेने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातून होत आहे. याविषयी महापालिकेकडे विचारणा केली असता तत्काळ या सांडपाणी वाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button