पुणे : पर्यावरणदिनानिमित्त निसर्गसंवर्धनाचा जागर; ‘दुर्मीळ होणार्‍या वृक्षांचे संवर्धन महत्त्वाचे’ | पुढारी

पुणे : पर्यावरणदिनानिमित्त निसर्गसंवर्धनाचा जागर; ‘दुर्मीळ होणार्‍या वृक्षांचे संवर्धन महत्त्वाचे’

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातील दुर्मीळ होत चाललेल्या वृक्षवल्लींचे संवर्धन करताना ‘इन सीटू’ अर्थात स्वस्थळी आणि ‘एक्स सिटू’ अर्थात स्थलबाह्य अशा दोन्ही पद्धतीने संवर्धन करायला हवे, असे मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.
पश्चिम घाटातील दुर्मीळ होण्याच्या मार्गावर असलेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘एक्स सिटू’ पद्धतीने पौडजवळील, नांदगाव येथील आर्क वेलनेस रिट्रीट येथे यशस्वीरीत्या साकारलेल्या सह्याद्री वन उद्यानाचे उद्घाटन गाडगीळ यांच्या हस्ते झाले.

त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात फुलांच्या संशोधनासाठी काम करणारे श्रीकांत इंगळहळीकर, आर्क वेलनेस रिट्रीटचे संस्थापक डॉ. लक्ष्मण कुलकर्णी, उद्योजक विठ्ठल कामत, सह्याद्री अकादमी ऑफ इकॉलॉजिकल सायन्सचे संस्थापक के. सी. मल्होत्रा, नांदगावचे सरपंच चेतन फाले, पौड – मुळशीचे वन अधिकारी संतोष चव्हाण, वनरक्षक संतोष मुंढे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

गाडगीळ म्हणाले, की वृक्षवल्लींचे जतन केवळ धार्मिक भावनेतूनच केले गेले हे बर्‍याच अंशी खरे असले तरी, इतर काही कारणांनीदेखील स्थानिकांनी आपापल्या ठिकाणी असलेली वनराजी जपली आहे. वटपौर्णिमेचा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो म्हणजेच अंदाजे 1500 वर्षांपूर्वीच्या कालखंडात. परंतु त्याआधी अस्तित्वात असलेल्या मोहंजदरोच्या संस्कृतीमध्ये पिंपळाच्या पानाच्या आकाराचा शिक्का मिळाल्याने त्या संस्कृतीमध्ये या प्रजातीतील वृक्षांना महत्त्व दिल्याची बाब अधोरेखित होते.

‘निसर्गनाद’ साजरा

बायोस्फिअर्स, इकोस्फिअर, व्हॉइस ऑफ वाइल्ड यांच्या पुढाकाराने आणि झपुर्झा व वनराई यांच्या सहकार्याने झपुर्झा, कुडजे-पुणे येथे निसर्गनाद हा पंचमहाभूतांवर आधारित उपक्रम साजरा करण्यात आला. यात पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश तत्त्वातील नाद हा नृत्य आणि दृकश्राव्य माध्यमातून अनुभवण्यात आला. रमेश मोगल, उपेंद्र धोंडे, मारुती गोळे, विवेक मुंडकुर आणि अथर्व पाठक यांचा सन्मान करण्यात आला. पर्यावरण आणि जैवविविधता बाबतीत काही लघुपटांचे सादरीकरण आणि माहिती पत्रकाचे अनावरण करण्यात आले. नृत्य आणि माहितीपत्रकाच्या माध्यमातून कलाकारांकडून शिववंदना दिली. श्वेथा लक्ष्मीनरसिम्हन, मानसी काळे, सानिका चव्हाण, क्षितिजा घाणेकर, मैथिली कुलकर्णी, वेदिका कुलकर्णी, इंद्रजितसिंह घोरपडे-गजेंद्रगडकर, सचिन पुणेकर आणि निवेदिता जोशी सहभागी झाले होते.

‘कल्पतरूह’ अभियानाला प्रारंभ

जागतिक पर्यावरणदिन व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या रविवार पेठ येथील सेंटरच्या रजत महोत्सवी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने कल्पतरूह अभियान राबविण्यात आले. या अभियानाची सुरुवात सोमवारी महंमदवाडी येथील इम्पेरियल टॉवर्समध्ये वृक्षारोपण करून करण्यात आली. पर्यावरणदिनापासून सुरू झालेले कल्पतरूह हे अभियान 25 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

या वेळी सेवा केंद्राच्या ब्रह्मकुमार आणि ब्रह्मकुमारी उपस्थित होत्या. कल्पतरूह हे अभियान ब्रह्माकुमारीज द्वारा धरतीला पुन: तिच्या मूळ स्थिती स्थापित करून देणे. तसेच, सर्वांमध्ये आध्यात्मिक मूल्यांची पुन:स्थापना करण्याचे एक अद्भुत जन अभियान आहे. याअंतर्गत, 5 जून ते 25 ऑगस्टदरम्यान प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी एक वृक्ष लावण्याचा आणि देखभाल करण्यासाठी प्रेरित केले जाणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. अभियान शुभारंभ कार्यक्रम शास्त्रज्ञ तारासिंग, मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, सहायक अधीक्षक रत्नाकर करडे, हॉर्टिकल्चर मिस्त्री ढोबळे व ब्रह्मकुमारी रोहिणी यांच्या उपस्थितीत पार पडला.

हेही वाचा

अध्यक्ष मिळेल का, अध्यक्ष? पुणे विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्षपद रिक्तच

शिवराज्याभिषेकाचा अमृतसोहळा

‘मिल्की वे’मध्ये असू शकतात राहण्याजोगे लाखो ग्रह

Back to top button