अध्यक्ष मिळेल का, अध्यक्ष? पुणे विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्षपद रिक्तच | पुढारी

अध्यक्ष मिळेल का, अध्यक्ष? पुणे विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्षपद रिक्तच

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्षपद रिक्तच आहे. अध्यक्ष नसल्यामुळे प्रवाशांच्या अडचणी सोडविण्याकडे सध्या दुर्लक्ष होत असून, केंद्र शासनाने हे अध्यक्षपद पोटनिवडणूक होईपर्यंत पुणे आणि परिसरातील इतर खासदारांकडे तात्पुरत्या स्वरूपात द्यावे, अशी मागणी होत आहे.

…म्हणून हवेत ’अध्यक्ष’

विमानतळाच्या प्रवासीअभिमुख विकासासाठी त्या विमानतळाच्या सल्लागार समितीची मोठी भूमिका व जबाबदारी असते. नवीन टर्मिनलचे काम, कार्गो कॉम्प्लेक्स, एरोमॉलचा अधिक उपयोग, आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढविणे, आयात-निर्यात, इन बॉण्ड कार्गो, विमानतळावरील कामांचा नियमित आढावा घेणे, सुशोभीकरणाची करिता विमानतळ मितीला अध्यक्ष असायला हवा.

अशी होते अध्यक्षाची नेमणूक

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या निर्देशानुसार ज्या लोकसभा खासदाराच्या मतदारसंघात विमानतळ असते, ते खासदार विमानतळ सल्लागार समितीचे अध्यक्ष असतात. या समितीचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व करण्याबरोबरच विमानतळावरील प्रकल्प वेळेत व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी, हवाई प्रवासी, कार्गो भागधारक, पुण्यातील उद्योग व पुणेकरांच्या विमानतळासंबंधी अपेक्षा, सूचना, गरजा संबंधित केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहचवून, त्यांचा पाठपुरावा करून त्या तडीस नेण्यासाठी अध्यक्षांची गरज आहे.

या खासदाराची होऊ शकते नेमणूक

पुणे जिल्ह्यातील पुणे, मावळ, शिरूर आणि बारामती या लोकसभेच्या चार जागा आहेत. बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा सध्या रिकामी आहे; मात्र मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघांतील खासदार जनतेसाठी कार्यरत आहेत. यातील एका खासदाराला ज्येष्ठतेनुसार पुणे विमानतळाचे अध्यक्षपद तात्पुरत्या स्वरूपात द्यावे, अशी मागणी होत आहे.

विमानतळाविषयी गरजांचे प्रतिनिधित्व करणारी पुणे विमानतळ सल्लागार समिती तातडीने सक्रिय करण्याची सध्या गरज आहे. बापटसाहेबांच्या निधनानंतर पुणे विमानतळ सल्लागार समिती नेतृत्वहीन झाली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे एरोमॉलचे काम वेळीच पूर्ण होऊ शकले. आता नवीन टर्मिनल प्रवाशांकरिता तातडीने खुले करण्याची गरज आहे. अध्यक्ष असते तर नवीन टर्मिनल तातडीने खुले झाले असते. मात्र, उशीर होत आहे. त्यामुळे केंद्राने पुणे आणि परिसरातील इतर खासदारांची पुणे विमानतळ सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक करावी.

– धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ

 हेही वाचा 

Nashik : माझी वसुंधरा स्पर्धेत शिरसाटे ग्रामपंचायत राज्यात प्रथम

मोठ्या आकाराच्या बाह्यग्रहावर पाण्याची वाफ

‘माझी वसुंधरा’ने पुणे जिल्हा सन्मानित; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना गौरविले

Back to top button