‘मिल्की वे’मध्ये असू शकतात राहण्याजोगे लाखो ग्रह | पुढारी

‘मिल्की वे’मध्ये असू शकतात राहण्याजोगे लाखो ग्रह

वॉशिंग्टन : आपली पृथ्वी ज्या सौरमालिकेचा एक भाग आहे ती सौरमालिका ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेचा एक हिस्सा आहे. या आकाशगंगेत सूर्यासारखे असंख्य तारे आणि वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य ग्रह आहेत. या आकाशगंगेत ‘हॅबिटेबल’ म्हणजेच राहता येण्याजोगे लाखो ग्रह असू शकतात असे संशोधकांना वाटते. अनेक तारे आपल्या भोवती फिरणार्‍या ग्रहांवर जीवसृष्टीसाठी पोषक वातावरण निर्माण करणारे असू शकतात.

अंतराळाच्या या अनंत पसार्‍यात ‘मिल्की वे’सारख्याही अनेक आकाशगंगा आहेत. केवळ ‘मिल्की वे’चाच विचार केला तर आपल्या सूर्य व ग्रहमालिकेप्रमाणे लाखो ग्रह-तारे या आकाशगंगेत आहेत. सूर्यापासूनचे विशिष्ट अंतर हे पृथ्वीवर जीवसृष्टी विकसित करण्यासाठीचे एक प्रमुख कारण आहे. सूर्याची रचना व त्यापासूनचे योग्य अंतर यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टीसाठी योग्य तापमान व वातावरण विकसित झाले आहे. आता नवे ग्रह शोधणार्‍या ‘केपलर’ मोहिमेतून असे दिसून आले आहे की ‘मिल्की वे’मधील अनेक एम ड्वॉर्फ्स किंवा रेड ड्वॉर्फ्स या नावाने ओळखले जाणारे खुजे लाल तारे आपल्या ग्रहांवर जीवसृष्टी विकसित करण्यासाठी पोषक आहेत.

आता ‘मिल्की वे’ नावाच्या आपल्या एका आकाशगंगेमध्येच असे जर लाखो ग्रह असतील तर संपूर्ण ब्रह्मांडातील वेगवेगळ्या आकाशगंगांमध्ये असे किती ग्रह असतील याची कल्पनाच केलेली बरी! फ्लोरिडा युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी केपलर मिशनमधून मिळालेल्या डाटाचे नव्याने अध्ययन केले आहे. त्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीच्या गैया सॅटेलाईटचीही मदत घेण्यात आली. हे सॅटेलाईट आपल्या सौरमालिकेच्या बाहेरील ग्रहांचे त्यांच्या तार्‍यापासूनचे अंतर व गती मोजते.

Back to top button