पुणे: सासूच्या तोंडावर फेकले गरम पाणी, दातही पाडले; घरात राहू नको म्हटल्याने जावई चिडला | पुढारी

पुणे: सासूच्या तोंडावर फेकले गरम पाणी, दातही पाडले; घरात राहू नको म्हटल्याने जावई चिडला

पुणे, पुढारी वृत्तसेवा: घरात राहू नको म्हटल्याच्या कारणातून चिडलेल्या जावयाने आपल्या सासूच्या तोंडावर गरम पाणी फेकले. त्यानंतर केसाला धरून जमिनीवर डोके आपटले. त्यामुळे सासूच्या तोंडातील दोन दात पडले आहेत. सुजाता कैलास शिंदे (वय 50) असे जखमी झालेल्या सासूचे नाव असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी, खडकी पोलिसांनी महेंद्र सिद्धनाथ तोरणे (वय 25,आर्मी क्वार्टर, सर्वत्र विहार कॉलनी, मुळा रोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याबाबत सुजाता शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 22 मे रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुजाता शिंदे ह्या खडकी येथील अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीत नोकरीस आहेत.

आरोपी महेंद्र हा त्यांचा जावई असून, त्यांची मुलगी आणि त्या असे तिघे आर्मी क्वार्टर, सर्वत्र विहार, मुळा रोडसमोर राहतात. सोमवारी सकाळी जावई आणि सासू यांच्यात वाद झाला. त्या वेळी त्यांनी जावयाला घरातून दुसरीकडे राहण्यास जाण्यास सांगितले. त्याचा त्याला राग आला. त्याने गरम पाणी सासूच्या तोंडावर टाकले. तपास पोलिस उपनिरीक्षक बेंदगुडे करीत आहेत.

Back to top button