नांदे-सुस रस्त्याच्या दुतर्फा मोठे खड्डे; मुळशीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष | पुढारी

नांदे-सुस रस्त्याच्या दुतर्फा मोठे खड्डे; मुळशीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

नांदे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : नांदे-सुस रस्त्यावर असलेल्या लुपिन फाट्यावर रस्त्याच्या दुतर्फा दोन मोठे खड्डे पडले आहेत. येथे अपघात होऊन चालकाला अपंगत्व आले व गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भातील वृत्त दै. ‘पुढारीने‘ प्रसिद्ध केले होते तसेच सरपंच निकिता रानवडे यांनीही खड्डे बुजवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. परंतु गेले एक महिनाभर वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील कामाकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते.

हे खड्डे एकाच ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असल्यामुळे खड्डे चुकवण्याच्या नादात समोरासमोर वाहनांची धडक होत आहे, तसेच काही लोक खड्ड्यात आपटल्यामुळे गाडीवरून पडून जखमी होत आहेत. संबंधित अधिकारी काम करत नसल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. अपघात होऊन एखाद्याचा जीव गेल्यावर हे खड्डे बुजवले जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुळशीतील उपअभियंता मधुकर डोंगरदिवे यांना संपर्क केला असता ‘खड्डे लवकर बुजवून घेतो,’ एवढेच उत्तर त्यांनी दिले.

गेला एक महिनाभर वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील या कामाची कुठलीही दखल घेतली जात नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे.

                                      – निकिता रानवडे, सरपंच, नांदे.

लुपिन फाटा येथील खड्ड्यांबरोबरच नांदे-महाळुंगे रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. याकडे लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे.

                                 – प्रशांत रानवडे, माजी सरपंच, नांदे गाव.

Back to top button