पुणे : हातगाडी चालकांकडून पदपथ गिळंकृत | पुढारी

पुणे : हातगाडी चालकांकडून पदपथ गिळंकृत

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे कॅन्टोन्मेंटमधील प्रमुख रस्ते, गार्डन परिसरात पथारी आणि हातगाडी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. याला कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकार्‍यांचे आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. तक्रारी आल्यानंतर किरकोळ कारवाई केली जाते. त्यानंतर काही दिवसांत ‘जैसे थे’ स्थिती निर्माण होते. रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणे हा कळीचा प्रश्न आहे. तीन दशकांपूर्वी महात्मा गांधी (एमजी रस्ता) रस्त्यावरील पथारीविक्रेत्यांना फॅशन स्ट्रीट मार्केट बांधून स्थलांतर करण्यात आले. कॅम्प परिसरातला हा प्रमुख रस्ता मोकळा व्हावा, रस्त्याची वहनक्षमता वाढावी, हा त्यामागचा उद्देश होता.

मात्र, गेल्या काही वर्षांत महात्मा गांधी रस्ता आणि लगतच्या पदपथांवर मोठ्या प्रमाणात पथारी विक्रेते, हातगाडीधारकांचे अतिक्रमण झाले आहे. सेंटर स्ट्रीटवर एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी होत नाही. त्यातच रस्त्यावर दोन्ही बाजूला पार्किंग आणि मध्येच हातगाडीधारकांच्या अतिक्रमणामुळे स्थानिकांची गैरसोय होते. ताबूत स्ट्रीटवरही अशीच परिस्थिती आहे. शनिवार आणि रविवारी एमजी रस्त्यावर दोन्ही बाजूंचे पदपथ आणि रस्त्यावर पथारी व्यावसायिक बसलेले असतात. त्यामुळे पादचार्‍यांना चालणेही कठीण असते. दरम्यान, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकार्‍यांशी संपर्क सांधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

अतिक्रमणाला कोणाचे अभय?
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत प्रमुख रस्त्यांसह काही गार्डनच्या समोर खाऊगल्ली तयार झाल्या आहेत. हे सर्व रस्त्यावर आणि पदपथावरच सुरू असल्याने वाहनधारकांसह पादचार्‍यांना त्रास होत आहे. या अतिक्रमणाला कोणाचे अभय आहे, याकडे कॅन्टोन्मेंट प्रशासन का दुर्लक्ष करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कारवाईपूर्वीच पथारीवाले पसार
नागरिकांच्या तक्रारीनंतर कारवाईसाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पथक महात्मा गांधी रस्त्यासह अन्य रस्त्यांवर जाते; परंतु हे पथक त्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच पथारीवाले हे त्या ठिकाणावरून पसार झालेले असतात, त्यामुळे पथक कारवाईसाठी येणार असल्याची माहिती त्यांना कोण आणि का देते, असा सवालही केला जात आहे.

Back to top button