सावधान..! पनीर घेताय? भेसळ तर नाही ? | पुढारी

सावधान..! पनीर घेताय? भेसळ तर नाही ?

दीपेश सुराणा : 

पिंपरी : आपल्या आहारामध्ये आता पनीर हा पदार्थ सहजतेने आला आहे. पनीर टाकून विविध भाज्या बनविल्या जात असल्याने पनीरला विशेष पसंतीदेखील मिळत आहे. त्यामुळे साहजिकच पनीरची मागणी वाढली आहे. नेमक्या याच बाबीचा फायदा घेऊन पनीरमध्ये भेसळ होऊ लागली आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये नुकतेच चिंचवड येथे 546 किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले. त्यामुळे आपण जे पनीर आवडीने खातो, त्यामध्ये भेसळ तर नाही ना? हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

सध्या सगळीकडे खोट्या आणि भेसळयुक्त गोष्टींचा भरणा सुरू आहे. काही काळापासून बनावट व भेसळयुक्त वस्तू बाजारात विकल्या जात आहेत. काही ठिकाणी रस्त्यावरदेखील कमी भावात पनीर विकले जाते. पण विकत घेतलेली वस्तू घरी घेऊन जात असताना ती खरी आहे की नाही, हे तपासून पाहिले जात नाही. चिंचवड येथील महाराष्ट्र मिल्क डेअरीवर खंडणीविरोधी पथक आणि अन्न व सुरक्षा विभागातील अधिकार्‍यांनी छापे टाकले. या कारवाईत 546 किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले. त्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे. पनीरमध्ये सध्या भेसळीचे प्रमाण अलीकडे खूप वाढले आहे. त्यामुळे पनीर विकत घेतल्यानंतर त्याची तपासणी करून नंतरच पदार्थ बनवायला हवे.

 

Back to top button