कुकडीच्या पाण्यासाठी आज जुन्नरला आंदोलन | पुढारी

कुकडीच्या पाण्यासाठी आज जुन्नरला आंदोलन

नारायणगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यातील कुकडी समूहातील धरणांमधील मृत पाणीसाठा कमी प्रमाणात शिल्लक असतानाही उन्हाळी आवर्तनासाठी कालवा सल्लागार समिती बैठकीत कर्जत-जामखेड, अहमदनगर येथील आमदारांनी वस्तुस्थिती विचारत न घेता अतिरिक्त पाण्याची मागणी करून व तसा निर्णय कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना अंधारात ठेवून घेतला. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. या निर्णयास विरोध दर्शविण्यासाठी रविवारी

(दि. 14) जुन्नर तहसील कार्यालय येथे जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी, सर्वपक्षीय नेते आंदोलन करणार आहेत, अशी माहिती जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे या पाण्यासाठी पुणे-नगर जिल्हा वाद पुन्हा पेटला आहे.
दि. 9 मे रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रोहित पवार, राम शिंदे, अतुल बेनके, अशोक पवार, बबनराव पाचपुते, कालवा सल्लागार समितीचे सचिव अधीक्षक अभियंता स. मा. सांगळे व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कुकडी डावा कालव्याचे उन्हाळी आवर्तन पुढे 30 दिवस चालू ठेवता येईल व यासाठी पिंपळगावजोगे धरणाच्या मृत साठ्यातून 3 टीएमसी पाणी घ्यावे लागेल, अशी मांडणी जलसंपदा विभागाने केली. आ. राम शिंदे व रोहित पवार यांनी विरोध दर्शवून पाणी लगेच सोडण्यात यावे, अशी मागणी केली.

यावर जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी पिंपळगावजोगे धरणातील मृत साठ्यातून 3 टीएमसी पाणी घेण्यास विरोध दर्शविला व त्याऐवजी 2 टीएमसीपेक्षा जास्त पाणी काढू नये, अशी मागणी केली तसेच मृतसाठ्यातून पाणी घेणे प्रकल्प अहवालाचा भाग नसताना हे पाणी वापरल्यास व पुढील वर्षी पावसाळा अपेक्षानुसार न झाल्यास पिंपळगावजोगे डावा कालव्यावरील खरिपाच्या आवर्तनावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करून पिंपळगावजोगे धरणातून मृतसाठ्यातील पाणी घेण्यास विरोध दर्शविला.

डिंभे, माणिकडोह वडज व येडगाव यातील 15 जुलैपर्यंत पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा राहील, याबाबत दक्षता घ्यावी, असे सुचवितानाच कुकडी डावा कालव्याचे आवर्तन 30 मेपासूनच सुरू करावे; जेणेकरून पिंपळगाव जोगे धरणाच्या उपयुक्त साठ्यातून कुकडी डावा कालवा आवर्तनासाठी पाणी घ्यावे लागणार नाही, अशी मागणी केली.

या मागणीनंतरही 22 मेपासून आवर्तन सोडण्यात येणार असून, जुन्नर व आंबेगावमधील धरणांची पाण्याची सध्याची स्थिती, मृतसाठ्यातील अतिरिक्त पाणी सोडल्यानंतर भविष्यात काय परिस्थिती निर्माण होऊ शकते, याबाबतची माहिती अधिकार्‍यांनी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सविस्तररीत्या न देता निर्णय घेतल्याने जुन्नरच्या हक्काच्या पाणी प्रश्नावर गदा येणार असल्याने हे आंदोलन करण्यात येणार आहे.

Back to top button