पुणे बाजार समिती आवारात फ्लेक्सचे पेव | पुढारी

पुणे बाजार समिती आवारात फ्लेक्सचे पेव

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात फ्लेक्सचे पेव फुटले असून, त्यापोटी बाजार समितीस उत्पन्नवाढीची चांगली संधी आहे. प्रत्यक्षात त्याच्या भाड्यापोटीच्या रकमा वसूल केल्या जातात की नाही? याबद्दलचा प्रश्न अनुत्तरित असल्याने हा विषय बाजारवर्तुळात अधिक चर्चिला जात आहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

बाजार समितीच्या संचालक मंडळाची पहिली सभा शुक्रवारी (दि. 12) सभापती दिलीप काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये बाजार समितीच्या सह्यांचे आर्थिक अधिकार सभापती आणि सचिवांना देण्यात आले, तर भाडेपट्टा अथवा समितीच्या विविध करारांबाबतचे सर्वाधिकार सभापती यांना देण्यात आले आहेत. या समितीत सभापती यांच्यासह दोन संचालक आणि समितीचे सचिव अशा 4 जणांचा समावेश राहील. भाडेपट्टा समितीची नावे अंतिम झालेली नसून आता सभापतीच अंतिम निर्णय घेतील.

दरम्यान, भाजीपाला बाजार, गूळ व भुसार बाजारात फ्लेक्सचे पेव फुटले आहे. समितीच्या आवारात फ्लेक्स लावताना पूर्वपरवानगी आणि रक्कम भरल्यानंतरच त्यांचा कालावधी निश्चित होतो. साधारणतः दिवसाला एक हजार रुपये भाडे घेतले जाते, अशी माहिती समितीकडून मिळाली. डिजिटल डिस्प्ले याचेही दर समितीने निश्चित केले असून, समितीच्या उत्पन्नवाढीसाठी ते महत्त्वाचे ठरतात. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. याबाबत बाजार समितीचे सचिव आर. एस. धोंडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, बाजार समितीच्या पूर्वीच्या ठरावानुसार फ्लेक्सबाबतच्या रकमेची आकारणी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल.

Back to top button