वेल्हे : तोरणागडाच्या तटबंदीखाली टेहळणी गुहा | पुढारी

वेल्हे : तोरणागडाच्या तटबंदीखाली टेहळणी गुहा

दत्तात्रय नलावडे

वेल्हे(पुणे) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतिकूल परिस्थितीत अतिदुर्गम तोरणागड जिंकून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या तोरणागडाच्या मेटपिलावरे मार्गालगत तटबंदीखाली तीन शिवकालीन गुहा स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने उजेडात आल्या आहेत. शिवरायांच्या उत्कृष्ट युद्धनीतीच्या साक्षीदार असलेल्या या गुहा सुस्थितीत आहेत. शिवरायांच्या अद्भुत शौर्याचा, मानवकल्याणकारी कार्याचा वारसा जिवंत करणार्‍या या गुहा कातरखडकात कोरलेल्या आहेत.

आणीबाणीच्या प्रसंगी गडाच्या संरक्षणासाठी गुहेतील पाहेरी चौकीचा उपयोग होत असे. बिकटप्रसंगी शत्रू विरुद्ध लढणारे पायदळ तसेच घोडदळाच्या राखीव सैन्यासाठी या गुहा तयार करण्यात आल्या असाव्यात असे स्थानिक अभ्यासकांचे मत आहे. चोहोबाजूंनी तोरणागड चढाईसाठी अतिबिकट आहे. त्यामुळे राखीव सैन्यासाठी गडाच्या तटबंदीखालील गुहेच्या टेहळणी चौक्यांची निर्मिती छत्रपती शिवरायांनी केली असावी, असे गुहेच्या रचनेवरून पुढे आले आहे.

गडाच्या पूर्वेस असलेल्या मेटपिलावरे (ता. वेल्हे) येथील शिवकालीन श्री कुंबळजाई मंदिरमार्गे तोरणागडावर जाणार्‍या शिवकालीन पाय मार्गालगतच्या आडबाजूला तटबंदीखाली या गुहा आहेत. तेथे जाण्यासाठी थेट पाऊलवाट अथवा वहिवाटीचे मार्ग नाही. मेटपिलावरचे माजी सरपंच हनुमंत पिलावरे तसेच काही ग्रामस्थांना नुकत्याच अडगळीत असलेल्या गुहा दिसल्या. कडेकपारीचे मोठे दगड उन्मळून पडल्याने तटबंदीखालून जाणारा जुन्या पाऊलवाटा बंद झाल्या आहेत.

त्यामुळे गाई, बैल, शेळ्या अशी जनावरे तसेच गुराखीही या भागात येत नाही. खाली खोल दरी व निमुळते डोंगर कडे आहेत. थेट पाऊलवाट मार्ग नसल्याने अडगळीच्या झाडाझुडपांतून मार्ग काढत हनुमंत पिलावरे व काही शिवभक्त ग्रामस्थ पहिल्या गुहेजवळ पोहोचले. दगड-मातीच्या ढिगारे व झुडपांमुळे गुहेत जाणारा मार्ग बंद झाला होता. दगड मलबा बाजूला करून ग्रामस्थ गुहेत गेले. त्या वेळी सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. तटबंदीखालील निमुळत्या खडकात वर-खाली गुहा आहेत. तेथून पुढेही तटबंदीखाली खडकात गुहा असाव्यात, असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

गुहेत बसण्यासाठी दगडी आसन व्यवस्था, तसेच 50 ते 60 सैन्यांना बसता येईल एवढी जागा आहे. गुहेची उंची साडेतीन ते चार फूट आहे. लांबी कमी-जास्त आहे. अखंड खडकात या गुहा तयार करण्यात आल्या आहेत. सीमेवर जवानांसाठी जमिनीत टेहळणी नाके तयार केले जाते अशी आधुनिक काळासारखी गुहांची रचना आहे. तटबंदीखाली कातर खडकात या तीन गुहा आहेत.

खोदकाम केल्यास गुहांची खोली व आकाराची माहिती मिळेल. वयोवृद्ध ग्रामस्थांना गुहांची माहिती होती. मात्र, आडबाजूला जाण्यासाठी वाट नसल्याने कोणी गेले नाही.

                                   हनुमंत पिलावरे, माजी सरपंच, मेटपिलावरे

सध्या तोरणागडाचा विकास आराखडा तयार केला जात आहे. यामध्ये या गुहांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच त्यांचे संवर्धन व जतन करण्यात येणार आहे. गडाच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणार्‍या या गुहा आहेत. त्या नुकत्याच उजेडात आल्या आहेत. त्या नेमक्या कोणत्या काळातील आहेत व त्यांचा उपयोग कशासाठी होत असे याबाबत सखोल संशोधन करण्यात येणार आहे.

                              विलास वाहणे, सहसंचालक, पुरातत्व विभाग

Back to top button