आळेफाटा: वाहन चोरीलाच आपला व्यवसाय बनविणारा अटकेत | पुढारी

आळेफाटा: वाहन चोरीलाच आपला व्यवसाय बनविणारा अटकेत

आळेफाटा (पुणे), पुढारी वृत्तसेवा: वाहने चोरी करण्याला आपला नियमित व्यवसाय बनवित दीडशेहून अधिक गुन्हे करणाऱ्या राजू बाबुराव जावळकर (वय ५५, रा. रिद्धीसिद्धी अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक ४०३, डोणजेफाटा, ता. हवेली,जि.पुणे) यास आळेफाटा पोलीसांनी अटक केली आहे. आळेफाटा येथून ९ एप्रिल रोजी रात्री जावळकरने एक क्रेनची चोरी केले. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या सराईत जावळकरची गोष्ट मोठी रसभरित आहे. राजू जावळकरला दोन मुले असून ती बोर्डिंगमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यासाठी राजू हा दरवर्षी दोघांची ८० हजार रुपये फी भरतो. तर पत्नी ही गृहिणी आहे. आई-वडील हे पुण्याजवळील एका खेड्यात राहतात. राजू हा गेली ४० वर्ष वाहन चोरी करून आपला प्रपंच चालवतो. चार चाकी चोरुन ती भंगारात विकणे हा त्याने आपला व्यवसाय बनविला.

पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेली माहिती अशी की, आळेफाटा येथून ९ एप्रिलच्या रात्री एक क्रेनची (एम.एच.०४ डी.टी.०२८३) चोरी झाली होती. या क्रेनच्या शोधासाठी पोलीस पथक नेमले. सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांसह पथक गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने जावळकर याला डोणजे फाटा येथून ताब्यात घेतले. जावळकरने ही क्रेन अंगद पूनम यादव (सध्या रा. कळंबोली, मुंबई, मूळ. रा. आझमगड, उत्तरप्रदेश) यास विकले असल्याची कबुली दिली. राजू जावळकर याच्याकडून स्कोर्पिओ (एम.एच.१६,ए.जी.४०४४) या वाहनासह ४० हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित बातम्या

ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, उप निरीक्षक पवार, हवालदार विनोद गायकवाड, नरेंद्र गायकवाड, भिमा लोंढे,नाईक संजय शिंगाडे, पंकज पारखे, जवान अमित मालुंजे, जवान नवीन अरगडे, जवान हनुमंत ढोबळे,प्रशांत तांगडकर यांच्या पथकाने केली.

… म्हणून क्रेनची चोरी

अपघात झाल्यास संबधित अपघातग्रस्त वाहन मालक हे अडचणीत असल्याचा फायदा घेत क्रेन चालक त्यांच्याकडून अधिकचे पैसे उकळतात. याचा मनात राग असल्याने राजू जावळकर याने ही क्रेन चोरली. ज्या वाहनांचे पेपर संपले आहेत व जेणेकरून मालक तक्रार करणार नाही. अशी जुनी चारचाकी वाहने चोरी करून ते भंगारात विकायचे काम राजू करतो.

Back to top button