चांडोली टोलनाका बाह्यवळण महामार्गवरून वाहतूक सुरू | पुढारी

चांडोली टोलनाका बाह्यवळण महामार्गवरून वाहतूक सुरू

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा :  राजगुरुनगरजवळच्या चांडोली टोलनाका येथून बाह्यवळण राष्ट्रीय महामार्ग सुरू झाल्याने शहरात होणारी दैनंदिन वाहतूक कोंडी संपुष्टात आली. त्यामुळे या ठिकाणी तासन् तास वाहतूक कोंडीत अडकणारे वाहनचालक, प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. राजगुरुनगर शहरात पुणे – नाशिक महामार्गावर दिवसभरात कायम वाहतूक कोंडी होत होती. यामध्ये वाहनचालक, प्रवासी तसेच स्थानिक त्रस्त झाले होते. कधी कधी वाहतूककोंडी तास-दोन तास रहायची, त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. सततच्या वाहतूक कोंडीने सर्व जण वैतागले होते आणि कधी यातून सुटका होणार म्हणून बाह्यवळण सुरू होण्याची वाट पाहात होते.

अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाने चांडोली टोलनाक्यापासून बाह्यवळणावरून वाहतूक सुरू केली. त्यामुळे सध्या शहरातून जाणार्‍या महामार्गाने मोकळा श्वास घेतला आहे. बाह्यवळण महामार्ग करताना होलेवाडी, ढोरेभांबूरवाडी, राक्षेवाडी, टाकळकरवाडी गावांना जाण्यासाठी उपरस्ते केल्याने आता त्या गावांची वाहतूक देखील सुलभ झाली आहे. वाहतूक कोंडी सोडविणार्‍या वाहतूक पोलिसांची देखील आता सुटका झाली आहे. दरम्यान बाह्यवळणावरून वाहने सुसाटपणे जात आहेत. दुसरीकडे मात्र राजगुरुनगर शहरातील महामार्गलगतच्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर याचा काहीसा परिणाम झाला आहे. वाहनांची वर्दळ कमी झाल्याने ग्राहकांचे प्रमाण कमी झाल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.

अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई गरजेची
बाह्यवळण महामार्ग सुरू झाला आणि राजगुरुनगरमधील वाहतूक कोंडी संपुष्टात आली, हे खरे आहे. परंतु शहरातील महामार्गावर खरा विळखा अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांचा आहे. तसेच बेशिस्तपणे उभ्या असलेल्या रिक्षा किंवा सहाआसनी वाहनांमुळे अजूनही काहीशा वाहतूक कोंडीला आमंत्रण मिळत आहेत. वाहतूक पोलिसांनी ही बाब लक्षात घेऊन कारवाई हाती घेण्याची गरज आहे.

Back to top button