पुणे : लम्पीग्रस्त जनावरांचे नमुने संकलन सुरू | पुढारी

पुणे : लम्पीग्रस्त जनावरांचे नमुने संकलन सुरू

नरेंद्र साठे : 

पुणे : राज्यातील लम्पी स्किनचा प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यांतील जनावरांचे नमुने (सॅम्पल) गोळा करण्यात येत आहेत. सर्व गोळा केलेल्या नमुन्यांवर बंगळुरू येथील प्रयोगशाळेत अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतरच जनावरांना लम्पीची लस देण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधून नमुने गोळा करण्याचे काम पशुसंवर्धन विभागाकडून सुरू आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये लम्पी प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली.

लम्पी स्किनचा प्रादुर्भाव संपला म्हणत असतानाच पुन्हा दौंड तालुक्यात पाच जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे समोर आले. ही सर्व जनावरे धोक्याच्या बाहेर आहेत. मात्र, पुन्हा लम्पी स्किनचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. खेड, दौंड, शिरूर, इंदापूर, बारामती, आंबेगाव, जुन्नरसह इतर काही तालुक्यांमधून नमुने गोळा करण्यात येत आहेत. प्रत्येक तालुक्यातून टप्प्याटप्प्याने 48 नमुने गोळा करण्यात येत आहेत. दोन वर्षांपुढील जनावरांच्या लसीकरणानंतर पंधरा दिवसांनी, दीड महिना, अडीच महिने असे प्रत्येक महिन्याला नमुने गोळा करण्यात येत आहेत. गोळा केलेले नमुने प्रयोगशाळेला पाठविण्यात येत आहेत.

अवकाळी पावसामुळे लम्पीची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र, दौंड व्यतिरिक्त इतर कुठेही संशयित जनावरे आढळली नाहीत. नव्याने लसीकरणाच्या अगोदर जिल्ह्यामध्ये नमुने गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्याचा अभ्यास करून मग लसीकरणाबाबत निर्णय होऊ शकतो.
                               – डॉ. शिवाजी विधाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प.

पुण्यामध्येच तयार होतेय लस
लम्पीचा गेल्या वर्षी प्रादुर्भाव वाढल्यानंतर गोट पॉक्स (शेळीची देवी) लस देण्यात आली होती. त्यानंतर आता पुण्यामध्येच लम्पीची लस तयार होणार आहे. पुण्यातील पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मित संस्थेकडून (आयव्हीबीपी) लम्पी प्रतिबंधक लशीचे उत्पादन केले जाणार आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात 26 ऑगस्ट 2022 रोजी लम्पी स्किन आजाराचे पहिले जनावर सापडले होते. तेव्हापासून 31 डिसेंबर 2022 दरम्यान 12 हजार 379 जनावरे या आजाराने बाधित झाली होती. त्यापैकी 11 हजार 237 जनावरे ही या आजारातून पूर्णपणे बरी झाली. उर्वरित 1 हजार 142 जनावरांचा या आजाराने मृत्यू झाला.

परिणामकारकता तपासली जाणार
गोट पॉक्स ही जनावारांना लस देण्यात आली. तिची परिणामकारकता नमुन्यांतून तपासली जाणार आहे. लशीच्या जनावरांमध्ये किती प्रतिजैवके (अँटीबॉडीज) शिल्लक आहेत, याची माहिती संकलित केली
जाणार आहे. आणखी किती दिवस या लशीचा प्रभाव दिसू शकतो, याचा अभ्यास केल्यानंतर नव्याने लसीकरणाचा निर्णय घेतला
जाणार आहे.

Back to top button