तोरणा-वरसगाव खोर्‍यात कृत्रिम पाणवठे | पुढारी

तोरणा-वरसगाव खोर्‍यात कृत्रिम पाणवठे

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : पानशेत, वरसगाव धरण खोर्‍यासह राजगड व तोरणा खोर्‍यातील जंगलात वाढत्या उन्हामुळे बहुतेक नैसर्गिक पाणवठे कोरडे पडले आहेत. त्यामुळे वन्यजीवांसाठी वन विभागाच्या वतीने कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. राजगड, तोरणा गडाच्या डोंगररांगांसह तालुक्यात जवळपास 10 हजार हेक्टरहून अधिक वनक्षेत्र आहे. रायगड जिल्ह्यालगतच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांपर्यंत घनदाट जंगल आहे. या भागात बिबट्यांसह हरीण, भेकर, पिसोरी, काळवीट, सांबर आदी प्राण्यांसह पक्ष्यांचा अधिवास आहे.

मात्र, एप्रिल महिन्यापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. परिणामी, वन्यप्राणी पाण्यासाठी मानवी वस्तीमध्ये शिरू लागले आहेत. या वेळी प्राण्यांची शिकार होण्याचे प्रकार होत आहेत. तसेच या वन्यप्राण्यांवर भटक्या कुत्र्यांचे हल्लेदेखील होताना दिसत आहेत. सध्या पाण्याअभावी वन्यजीवांचे हाल होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर वेल्हे तालुका वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लगुंटे यांच्या देखरेखीखाली वन हद्दीत पाणठ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यालगतच्या घोल, गारजाईवाडी, टेकपोळे, खाणु, चांदर, पोळे, दापसरे भागातील झरे, टाके अशा नैसर्गिक पाणवठ्याची स्वच्छता करण्यात आली आहे. मोठ्या वाहनांचे टायर ठेवून त्याचे कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. पानशेत, वरसगाव धरण भागातील जंगलात 20 वनतळी तयार केली आहेत. एक वनतळे एक हजार लिटर क्षमतेचे आहे. एक मीटर खोली व दहा मीटर रुंदीचे आहे. सभोवताली दगडी भिंत बांधून खोल खड्ड्यात प्लास्टिकचे कागद अंथरले आहेत. या तळ्यात टँकरने पाणी टाकले जात आहे.

भीषण वणव्यामुळे पाणवठे, खाद्य नष्ट

उन्हाळ्याच्या सुरुवातीला वेल्हे तालुक्यातील 50 टक्क्यांहून अधिक जंगले वणव्यामुळे जळून खाक झाली. त्याचा फटका नैसर्गिक पाणवठ्यासह वन्यजीवांच्या खाद्यास बसला. गवत चारा, वनस्पतींसह रानफुले, रानफळे खाक झाली. झरे, कड्यातील पाणवठे कोरडे ठणठणीत पडल्याने खाद्य, पाण्यासाठी वन्यजीव स्थलांतर करत आहेत.

आंबेड, वडघर, मोसे बुद्रुक, वरसगाव या भागांत वन्यजीवांची संख्या अधिक आहे. या ठिकाणच्या वनतळ्यांमुळे वन्यप्राण्यांना, पक्ष्यांना पाणी मिळत आहे.

                            – बंडू खरात, वनरक्षक, वनविभाग, पानशेत.

Back to top button