पिंपरी : कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर कधी सुरू करणार? | पुढारी

पिंपरी : कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर कधी सुरू करणार?

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने संपूर्ण शहरात अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. तसेच, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निगडी येथे कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे काम अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेला त्याचा कोणताही फायदा होत नाही. हे काम कधी पूर्ण करणार? असा सवाल करीत पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौंबे यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

‘तसरा डोळा झोपलाय ! ’ असे ठळक वृत्त ‘पुढारी’ने 10 एप्रिल 2023 ला प्रसिद्ध केले होते. तसेच, स्मार्ट सिटीच्या अनागोंदी कारभाराबाबत वारंवार ठळक वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्या वृत्तांची दखल घेऊन पोलिस आयुक्त चौंबे यांनी महापालिकेचे आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांना नाराजीच्या सूरात पत्र लिहले आहे.

पोलिस आयुक्त चौंबे यांनी तक्रार करताना म्हटले आहे की, स्मार्ट सिटीच्या वतीने पोलिसांसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर उभारण्यात येत आहे. शहरात गुन्हे प्रतिबंध व निगराणी, वाहतूक नियंत्रण व नियमन, कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांंचा तपास करणे आदीकरिता सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात येत आहेत. कॅमेरे बसविण्याचे काम बर्‍याच महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे अद्यापर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांना त्याचा काहीच उपयोग होत नाही. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या मागील दोन बैठकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे काम तातडीने पूर्ण करण्याची ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह यांनी दिली होती. मात्र, अद्याप काम पूर्ण झालेले नाही. पोलिस आयुक्तालयात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे व्हीव्हीग सुविधा देण्यात आलेली नाही.

संबंधित ठेकेदार हे फायबर ब्रेक झाली. विद्युत मीटर लागलेले नाहीत, अशी तांत्रिक कारणे देत आहे. स्मार्ट सिटीच्या या कासव गती कारभारावर पोलिस आयुक्त चौबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. थेट पोलिस आयुक्तांनी स्मार्ट सिटीच्या कारभारावर शंका उपस्थित करीत नाराजी व्यक्त केल्याने त्याची तातडीने दखल घेतली जाते का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Back to top button