पुणे : शिक्रापुरात कपड्याचे दुकान आगीत खाक | पुढारी

पुणे : शिक्रापुरात कपड्याचे दुकान आगीत खाक

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा :  शिक्रापूर (ता. शिरूर) येथील एसटी स्टँडसमोर असलेले वामा फॅशन हे कपड्याचे दुकान रविवारी (दि. 16) सकाळी लागलेल्या आगीत जळून खाक झाले. यात तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. नागरिकांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. शिक्रापूर एसटी स्टँडसमोरील शिवाजी धुमाळ हे रविवारी सकाळी पावणेसात वाजता घराबाहेर आले असता त्यांना वामा फॅशन या दुकानातून धूर येत असल्याचे दिसले.

त्यांनी तातडीने शेजारील सुनील चौरसिया व अन्य व्यक्तींना याबाबत सांगितले. दरम्यान, दुकान चालकाला बोलावण्यात आले. संतोष चौरसिया, सुनील चौरसिया, प्रदीप थोरात, सतीश सासवडे, समीर शेख, किरण चौरसिया, सचिन चौरसिया, दस्तगीर शेख, योगेश लोखंडे, शुभम चौरसिया, राजेश धुमाळ, पप्पू सासवडे आदींनी पाण्याच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय चौधर व पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी आटोक्यात आणली.

पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे अग्निशमक दलाचे केंद्र अधिकारी विजय महाजन, नितीन माने, फायरमन प्रशांत अडसूळ व त्यांचे सहकारी,रांजणगाव औद्योगिक वसाहतच्या अग्निशमक दलाचे केंद्र अधिकारी महेंद्र माळी व त्यांचे सहकारी जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या प्रयत्नाने तसेच अग्निशमन दलाच्या दोन तुकड्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र, दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

Back to top button