कांदा, बटाटा, कैरीची आवक वाढली; वेफर्स, पापडासाठी बटाट्याला मागणी | पुढारी

कांदा, बटाटा, कैरीची आवक वाढली; वेफर्स, पापडासाठी बटाट्याला मागणी

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्याची सुरुवात झाली की, घरोघरी वेफर्स, पापड, कुरडया करण्यामध्ये गृहिणी गुंतून जातात. यामुळे बटाट्याच्या मागणीत मोठी वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. तसेच कांदा आणि कैरीची आवक देखील वाढली आहे. मात्र बिन्सची आवक कमी झाल्याने दरात वाढ असल्याचे चित्र रविवारी बाजारात दिसून आले.

पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी उपबाजार, पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडई व आकुर्डी येथील किरकोळ बाजारात बटाटा 30 रुपये प्रतिकिलो तर बिन्सच्या दरात वाढ झाल्याने 70 ते 80 रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. तसेच बाजारात कर्नाटक कैरीची आवक देखील मोठ्या प्रमाणात झाली असून, मागणीमध्येही मोठी वाढ असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

मोशी उपबाजारात कांद्याची आवक 910 क्विंटल, बटाटा 473 क्विंटल, टोमॅटो 375 क्विंटल, मटार 16 क्विंटल, भेंडी 70 क्विंटल एवढी आवक झाली आहे. गेल्या आठवड्यापासून शेवग्याचा हंगाम असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात आवक असली तरी या रविवारी किरकोळ बाजारात प्रतिकिलो 80 ते 90 रुपये विक्री होत आहे.

तसेच घाऊक बाजारातील प्रतिकिलो दर मिरची 35, कांदा 8 ते 9, बटाटा 8, लसूूण 35 ते 40, आले 30, टोमॅटो 10 ते 12, भेंडी 25, मटार 30 रुपये दराने विक्री होत आहे. मोशी उपबाजारात पालेभाज्यांच्या एकूण 38000 फळे 869 क्विंटल आणि फळ भाज्यांची आवक 2616 क्विंटल एवढी झाली.

पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे किरकोळ भाव
पालेभाज्या ः दर (प्रति पेंडी)
मेथी 15
कोथिंबीर 15
कांदापात 10
शेपू 10
पुदिना 05
मुळा 15
चुका 15
पालक 15

फळभाज्यांचे : किलोचे भाव
भेंडी 60
टामॅटो 25 ते 30
सुरती गवार 100
गावरान गवार 120
दोडका 40
दुधी भोपळा 50
लाल भोपळा 50 ते 60
कारली 40
वांगी 50-50
भरीताची वांगी 60
तोंडली 50
पडवळ 40
फ्लॉवर 50
कोबी 30
बिन्स 70-80
बीट 60
आवळा 50
राजमा 30
काकडी 40

Back to top button