कृत्रिमरीत्या आंबा पिकवाल तर खबरदार ! कार्बाइडचा वापर टाळा अन्यथा कठोर कारवाई | पुढारी

कृत्रिमरीत्या आंबा पिकवाल तर खबरदार ! कार्बाइडचा वापर टाळा अन्यथा कठोर कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अवकाळी पावसामुळे आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने फळविक्रेते आणि व्यापार्‍यांना आंबा कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर टाळावा अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे. यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरात आंबा विक्रेते आणि घाऊक विक्रेत्यांची तपासणी सुरू झाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, पेठ परिसर, महात्मा फुले मंडई, वडगावशेरी, खडकी यांसह इतर किमान 16 ठिकाणांची तपासणी करण्यात आली आहे. वडगाव शेरी परिसरातून संशयास्पद आढळलेल्या आंब्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

त्याबाबतचा अहवाल प्रलंबित असून, त्याआधारे पुढील कार्यवाही केली जाईल. येत्या आठवडाभरात एफडीएची शहरातील फळ विक्रेत्यांसोबत पुन्हा बैठक होणार आहे. फळांची हाताळणी, साठवणूक आणि विक्री करताना स्वच्छता राखण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. फळे पिकवण्याच्या सुरक्षित पद्धती, अस्वच्छ साठवणीचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबद्दल चर्चा होणार आहे.

आंबे नैसर्गिकरीत्या पिकवणे आवश्यक आहे. पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड वापरणे विक्रेत्यांनी टाळावे. याआधीच शहरातील फळ व्यापार्‍यांसोबत बैठक घेतली असून, त्यांना याबाबत कल्पना दिली आहे. एफडीएचे अधिकारी हे व्यापारी आणि एजंटांकडून विक्री केलेल्या फळांची तपासणी करतील आणि संशयास्पद फळे आढळल्यास प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवतील.
                   – अर्जुन भुजबळ, सहआयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, पुणे विभाग.

Back to top button