…भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी सुरुंग पेरणार का? | पुढारी

...भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी सुरुंग पेरणार का?

संदीप बल्लाळ :

वरकुटे बुद्रुक : इंदापूर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपने माघार घेतल्याने वरकुटे बुद्रुक, लोणी देवकर, अगोती, भावडी, चांडगाव या उजनी बॅकवॉटर परिसरातील भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी देऊन सुरुंग पेरणी करून आलेल्या संधीचे सोने करणार का? अशा चर्चा गावागावांत रंगू लागल्या आहेत.

हा परिसर पूर्वीपासूनच भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या परिसरामध्ये राष्ट्रवादीला आमदारकीसोडून आजपर्यंत कधीच अपेक्षित यश मिळाले नाही. या भागावर स्व. शंकराव पाटील यांच्यापासून ते आजपर्यंत कारखान्याच्या किंवा विविध संस्थांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ दिल्याने आपली पकड कायम मजबूत ठेवण्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांना यश मिळाले आहे.मात्र, राष्ट्रवादीसाठी कायम डोकेदुखी ठरलेले हा भाग बाजार समिती निवडणुकीमुळे चर्चेत आला आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका तोंडावर आलेल्या असताना या परिसरात राष्ट्रवादी बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी देत पक्षकार्यकर्त्यांना बळ देणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपच्या माघारीनंतर लढतीमध्ये मोठी चुरस राहिली नसल्याने राष्ट्रवादी व आप्पासाहेब जगदाळे यांचे उमेदवार विजयी होणार, यात कोणतीही शंका कार्यकर्त्यांमध्ये नाही. यामध्ये उजनी परिसरातील लोणी देवकरमधून सुहास डोंगरे व अमोल डोंगरे, वरकुटे बुद्रुकमधून संदेश देवकर, अगोती नं. 2 मधून मनोहर ढुके व कळाशीमधून सुरेखा गोलांडे, नीलेश देवकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. 20 तारखेला यातील कोणा एकाच्या नावावर शिकामोर्तब झाल्यास भाजपच्या मताधिक्य आणि प्राबल्य असणार्‍या या भागांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी मिळणार असून, भविष्यात पक्षवाढ व मजबुतीकरिता याचा मोठा फायदा पक्षाला होणार आहे.

भाजपकडून कार्यकर्त्यांना दिल्या जाणार्‍या न्यायामुळे पक्षवाढीसाठी पोषक वातावरण या भागात आहे. राष्ट्रवादीकडून अलीकडील काळात या भागांमध्ये कोणतेही मोठे पद दिले गेले नसल्यामुळे फक्त निष्ठावंतांच्या आधारावर पक्ष मजबुतीचे काम करीत आहे. निष्ठावंतांना उमेदवारी देत पक्षकार्यकर्त्यांना बाजार समितीत उमेदवारी देऊन न्याय देण्याचे काम होते का? याकडे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये माने कुटुंबाची उमेदवारी सोडता भाजपचा गड राहिलेल्या या भागांमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी हीच ती वेळ असल्याचे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. राष्ट्रवादीकडून कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणार की पुन्हा एकदा ’अ‍ॅडजस्टमेंट’चे गाजर हातात मिळणार, हा येणारा काळच सांगणार आहे.

Back to top button