पुणे : वाहतूक पोलिसांच्या ‘त्या’ अर्थपूर्ण कर्तव्याला चाप ! | पुढारी

पुणे : वाहतूक पोलिसांच्या 'त्या' अर्थपूर्ण कर्तव्याला चाप !

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वाहतूक पोलिसांच्या टेम्पो व क्रेनवरील त्या अर्थपूर्ण कर्तव्याला आता चाप बसणार आहे. टोइंग कारवाईसाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मार्गदर्शिका (एसओपी) तयार केली आहे. त्या चौकटीतच आता वाहतूक पोलिसांना काम करावे लागणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे टोइंग कर्तव्यावरील कर्मचारी आठ दिवसांना बदलले जाणार आहेत. पूर्वी काही कर्मचार्‍यांनी या कर्तव्यासाठी मक्तेदारी निर्माण केल्याचे चित्र होते.

दैनिक ‘पुढारी’ने ऑफ द रेकॉर्ड’ या सदरात ‘ते’ बजावताहेत खाबूगिरीचे ‘कर्तव्य’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून टेम्पो, क्रेनवरील अनागोंदी कारभाराला वाचा फोडली होती. वाहतूक विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांत टेम्पो व क्रेनवरील कर्तव्याबरोबरच मार्शल कर्तव्यासाठी मोठी चुरस असते. काही कर्मचारी गेल्या कित्येक दिवसांपासून टेम्पो आणि क्रेनचेच कर्तव्य करीत आहेत. त्यांना बदलून काम दिले की जोपर्यंत आपला टर्न येत नाही तोपर्यंत ते सुटीवर निघून जातात. असेही काही विभाग आहेत, की जेथे महिला कर्मचारी हे कर्तव्य बजावण्यास मागे नाहीत.

गेल्या काही दिवसांमध्ये टेम्पो व क्रेनवरील टोइंग कारवाईदरम्यानचे अनेक गैरप्रकार समोर आले. टोइंग वाहनावर काम करणार्‍या खासगी कामगारांमार्फत वाहनचालकांकडून पैसे वाहतूक पोलिस घेतात, असा आरोप आहे. तसेच, अनेकदा वादावादीच्या घटना देखील घडतात. एवढेच नाही, तर वाहन टोइंग करताना वाहनचालक जर तेथे असतील तर त्यांना वाहन न देता चौकीला बोलावले जायचे.
टेम्पोवर काम करणारे खासगी कामगार कारवाईत हस्तक्षेप करताना दिसून आले आहेत. त्यांच्या उद्धट वर्तनाचा नागरिकांना सामना करावा लागला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची गांभीर्याने दखल घेत आयुक्तांनी एसओपी तयार केली आहे.

अशी आहे एसओपी…

  • टोइंग वाहने आरटीओ नियमांची काटेकोर पूर्तता करणारी असावीत.
  • गाडीवर काम करणार्‍या खासगी कामगारांची चारित्र्य पडताळणी आवश्यक.
  • पी. 1 पी. 2 बोर्डाची खात्री करावी.
  • टोइंगच्या कार्यवाहीसाठी संबंधित विभागाचे प्रभारी अधिकारी जबाबदार.
  • पोलिस नाईक व त्यावरील दर्जाच्या अंमलदारांनाच टोइंग कर्तव्य.
  • मोबाईल, वॉकीटॉकीमुळे नेमप्लेट झाकली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी.
  • प्रत्येक आठवड्याला क्रेनवरील कर्मचारी बदलणार.
  • कारवाईदरम्यान कर्मचार्‍यांचे वर्तन नागरिकांसोबत सौजन्याचे असावे.
  • वाहतूक नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे लागणार.
  • दररोज सकाळी खासगी कामगारांचा 9 वाजता रोलकॉल.
  • नो-पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांचा कारवाई करताना फोटो ठेवावा लागणार.
  • क्रेनवरील कॅमेरे सुरू ठेवावे लागणार.
  • क्रेनवरील कामगार नागरिकांसोबत बोलणार नाहीत.
  • दंड सोडून कोणतीही रक्कम घेता येणार नाही.
  • वाहन टोइंग केल्यानंतर वाहनचालक जागेवर आल्यास दंडात्मक कारवाई करून वाहन त्यांच्या ताब्यात देण्यात यावे. अशावेळी चौकीला घेऊन जाण्याची गरज नाही.
  • कारवाईचे रजिस्टर अद्ययावत ठेवावे लागणार.
  • गाडी उचलून नेल्यानंतर तेथे खडूने स्पष्ट उल्लेख कारावा.

टेम्पो, क्रेनचे गणित गोलमाल!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक टेम्पो आणि क्रेनवरील पोलिस कर्मचार्‍यापासून ते तेथे काम करणार्‍या कामगारांना दिवसाचे टार्गेट दिले जाते. दिवसाकाठी 35 पावत्या करण्याचे टार्गेट असते. मात्र, लक्ष्मीदर्शनाच्या मोहापायी हे कर्मचारी न दमता, न थकता सत्तरपर्यंतचा टप्पा गाठतात. त्यातील अर्ध्या वाहनचालकांना दंडाच्या दराचा आकडा वाढवून प्रत्येक आठवड्याला मोठी मजल मारतात.

दंड मोठा असल्यामुळे वाहनचालक देखील सहज चिरीमिरी देण्यासाठी तयार होतो, तर क्रेनबाबतीत बोलायचे झाले तर प्रत्येक गाडी क्रेनवाल्याकडून उचलून विभागात जमा केली जात नाही. ठरावीक गाड्या उचलल्यानंतर काही गाड्यांना जामर लावून तेथेच ठेवले जाते. तेथे विभागाचा किंवा संबंधित कर्मचार्‍याचा संपर्क क्रमांक दिलेला असतो. वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रत्येक उचललेल्या गाडीची नोंद रजिस्टर व क्रेन टेम्पोच्या कॅमेर्‍यात करण्यास सांगितले आहे. मात्र, असे असताना देखील चलाखी करून हे कर्मचारी आपल्या वरिष्ठांच्या आदेशाला हरताळ फासून ‘अर्थ’पूर्ण कर्तव्य चोख निभावतात.

Back to top button