पिंपरी : नेटपॅकअभावी डिजिटल शिक्षण हॅक; पालिका शाळांतील स्मार्ट टीव्ही शोभेचे | पुढारी

पिंपरी : नेटपॅकअभावी डिजिटल शिक्षण हॅक; पालिका शाळांतील स्मार्ट टीव्ही शोभेचे

वर्षा कांबळे

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत सर्व शाळांमध्ये ई – लर्निंगची सुविधा देण्यात दिली आहे. मात्र, एकीकडे इंटरनेट सुविधा नसल्याने शिक्षकांना स्वत:च्या स्वखर्चाने नेटचा भार उचलावा लागत आहे. तर ज्या शाळांमध्ये नेट सुविधा आहे तिथे वाय – फायचा वेग कमी पडत आहे. त्यामुळे स्मार्ट टीव्ही शोभेचे झाले आहेत.

स्मार्ट सिटीअंतर्गत मनपाच्या सर्व प्राथमिक शाळा इंटरनेटने जोडण्यात आल्या आहेत. तसेच सर्व शाळांमध्ये वाय – फाय सुविधा देण्यात आली आहे. खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना ज्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. ज्या तंत्रज्ञान व माध्यमांचा वापर केला जातो. त्याप्रमाणे मनपा शाळांमध्ये डिजिटलायजेनच्या दृष्टीने पूरक गोष्टींचा अंतर्भाव यामध्ये केला आहे.

शहरामध्ये महापालिकेच्या 123 शाळेत गोरगरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशी मुले शिक्षण घेतात. डिजिटल शिक्षण महापलिका शाळेतील विद्यार्थ्यांना परवडणारे नसते. या मुलांनाही खासगी शाळांसारखे शिक्षण मिळावे. तसेच महापालिका शाळांचा घसरलेला शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी या सुविधा देण्यात आल्या आहेत. मात्र, नेटपॅक नसल्याने याचा उपयोगच होत नाही.

खरे पाहता कोरोनाकाळात सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणासाठी या सुविधा मैलाचा दगड ठरणार्‍या आहेत. या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक वर्गात बसविण्यात येणार्‍या स्मार्ट बोर्डमध्ये मुलांच्या अभ्यासासाठी उपयोगी असणारे व्हिडीओचादेखील अंतर्भाव आहे. त्यामुळे मुलांना विषय सोप्या पद्धतीने कळणार आहेत. तसेच नव्याने मुलांना अभ्यासाला पूरक असे व्हिडीओ तयार केले जाणार आहेत. छोट्या मोबाईलवरून शिकविण्यापेक्षा स्मार्टबोर्डवरून शिकविणे सध्याच्या परिस्थितीत फायदेशीर ठरणारे आहे.

शिक्षक करताहेत मोबाईलमधील नेटचा वापर

पालिकेच्या काही शाळांमध्ये वाय – फाय सुविधा देण्यात आली आहे. मात्र, एकाचवेळी अनेक वर्गात उपयोग होत असल्याने वाय – फायचा वेग कमी होतो आणि शिकविण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे काही शिक्षक स्वेच्छेने स्वत:च्या मोबाईलमधील नेट वापरून मुलांना शिकवितात, तर काही फळ्याचा वापर करतात.

या शाळांमध्ये नाही नेट सुविधा

स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ज्या शाळांची इमारतीची दुरवस्था आहे, अशा शाळांत ही सुविधा नाही. यामध्ये दापोडी येथील 4 शाळा, भोसरी माध्यमिक शाळा व इंद्रायणीनगर शाळा, वैदूवस्ती शाळा आणि इतर ग्रामीण भागातील शाळांमध्ये ही सुविधा नाही. तर जाधववाडी, खराळवाडी, पिंपळे गुरव, केशवनगर प्राथमिक आणि इतर शाळांमध्ये नेट नसल्याने स्मार्ट टीव्ही बंद आहेत. नाहीतर शिक्षक स्वत:चे नेट वापरतात.

नेट सुविधा आहे, पण काही ठिकाणी चालत नसेल. मी माहिती तंत्रज्ञान विभागाशी बोललो आहे. ज्या शाळांचे नेट चालत नसेल, त्या मुख्याध्यापकांनी सारथीच्या शिक्षकांसाठी असलेल्या लॉगीनवर तक्रार द्यायची आहे. त्यांनी सारथीवर तक्रार नोंदविल्यानंतर संबंधित विभाग त्या समस्येचे निवारण करणार आहेत.

                             -संदीप खोत, शिक्षण उपायुक्त, पिं.चिं. मनपा

आम्हाला शिक्षण विभागाने नेट नसलेल्या शाळांची यादी द्यावी. नेटसंबंधी सर्व प्रशिक्षण शिक्षकांना दिले आहे. पण शिक्षक एक्सपर्टवरच अवलंबून राहतात. तरीदेखील आम्ही नेट नसलेल्या शाळांची माहिती घेऊन नेट सुरू करू.

             -नीळकंठ पोमण, सह मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी

Back to top button