‘पद्म’साठी शिफारस पद्धत मोदींकडून मोडीत : पालकमंत्री पाटील | पुढारी

‘पद्म’साठी शिफारस पद्धत मोदींकडून मोडीत : पालकमंत्री पाटील

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ सन्मानासाठी पूर्वी राजकीय नेत्यांच्या शिफारशींवरून नावे निश्चित केली जात होती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिफारस करण्याची परंपरा मोडीत काढली. आता जे लोक समाजासाठी काम करतात, अशा व्यक्तींनाच सन्मानित केले जाते, असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

गोंधळी व विमुक्त जाती-जमाती विकास संघाच्या वतीने नागरी सत्कार आणि वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी पाटील बोलत होते. या वेळी भिकू रामजी इदाते, गिरीश प्रभुणे, परशुराम गंगावणे, पांडुरंग घोटकर, सुधाकर गीते, पहिली ’महिला महाराष्ट्र केसरी’ प्रतीक्षा बागडी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

देशात सर्वोच्च समजल्या जाणार्‍या पुरस्कारांसाठी शिफारस पद्धत बंद करण्यात आली. या पुरस्कारासाठी आता ऑनलाइन अर्ज मागविले जातात. अर्जांची पडताळणी केली जाते. त्यासाठी केंद्र शासनाची एक संस्था देशभर फिरून काम करते. त्या संस्थेने दिलेल्या अहवालानुसार पुरस्कारासाठी व्यक्तींची निवड केली जाते, असे पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील घेताहेत खबरदारी
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही कार्यक्रमांत केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. तशी चूक पुन्हा होऊ नये, यासाठी पाटील यांनी आता लिखित भाषण वाचायला सुरुवात केली आहे. त्यावर ते म्हणाले, ’मी आता लिखित भाषण वाचायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कार्यक्रमाशी संबंधित संदर्भ चुकणार नाहीत. त्यानंतर मला काही बोलायचे असेल, तर मी माझे मनोगत व्यक्त करतो.’

तू तुझा प्रवास थांबवू नको…
महाराष्ट्र केसरी पहिली महिला प्रतीक्षा बागडी हिचा चंद्रकांत पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी बागडीला शुभेच्छा देताना पाटील म्हणाले, ’खेळातील करिअर सध्या खूप महत्त्वाचे मानले जाते. पैलवानांना महाराष्ट्र केसरी हा किताब लवकर नको असतो. तो एकदा मिळाला, की पुढचा प्रवास थांबतो. परंतु, तू तुझा प्रवास थांबवून नकोस, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळ.’

Back to top button