पिंपरी : वनवे करूनही फेमस चौकात वाहतूककोंडी | पुढारी

पिंपरी : वनवे करूनही फेमस चौकात वाहतूककोंडी

दापोडी : सांगवी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते बा. रा. घोलप महाविद्यालय कॉर्नर या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. रहदारीचा हा रस्ता असल्याने वाहतूक सुरळीत होण्यासाठी वनवे करण्यात आला आहे. परंतु, उलट दिशेने येणार्‍या वाहनांमुळे शनी मंदिरमार्गे फेमस चौक ते नवी सांगवीतील क्रांती चौकापर्यंत वाहतूककोंडी होत आहे.

कामामुळे रस्ता अरुंद

जुनी सांगवी, नवी सांगवी, दापोडी, पिंपळे गुरवकर परिसरातील नागरिक पुणे व चिंचवड, पिंपळे निलख आदी भागाकडे ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात. उतार व वळणाचा रस्ता त्यातच सुरू असलेल्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. पुणे, औंध व इतर भागात शाळा महाविद्यालयासाठी येथून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी बसची वाहतूक होते. त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी
खासगी बस या भागातून ये-जा करत असल्यामुळे वाहतूककोंडीत आणखी भर पडत आहे. खासगी प्रवासी वाहनांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सायंकाळी वाहतूककोंडी होते. मोठी वाहने, खासगी बसथांबे, रस्त्याकडेला होणारी बेकायदा पार्किंगवर पोलिस प्रशासनाकडून प्रतिबंध करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

फेमस चौक, साई चौक येथे दिशादर्शक फलक लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होण्यासाठी नागरिकांनीही वनवेचा वापर करून सहकार्य करावे.
                        – प्रसाद गोकुळे, पोलिस निरीक्षक, सांगवी विभाग वाहतूक

गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याचे काम रखडले होते. सध्या काम सुरू आहे. यामुळे नागरिकांना रहदारीचा त्रास सहन करावा लागत आहे. फेमस चौकात दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे. अथवा येथे वाहतूक नियोजनासाठी पोलिसांची नियुक्ती करावी.
                                               – शिवाजी पाडुळे, रहिवासी नवी सांगवी

Back to top button