ओतूर : अजिंक्य डुंबरेने पटकावली फिरती चांदीची गदा | पुढारी

ओतूर : अजिंक्य डुंबरेने पटकावली फिरती चांदीची गदा

ओतूर; पुढारी वृत्तसेवा : विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांनी खामुंडी (ता. जुन्नर) येथील श्री काळभैरवनाथांची यात्रा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. दर्शनासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्ती आखाड्यात ओतूरचा मल्ल अजिंक्य डुंबरे याने चितपट कुस्ती करून चांदीची फिरती गदा व रोख पारितोषिक पटकाविले.

यात्रेनिमित्त पहाटे श्री काळभैरवनाथांचा महाअभिषेक, महाआरती, सायंकाळी हरिपाठ, भजन, देवाचा पोशाख, हारतुरे, मांडव डहाळे, शेरण्या, पालखी सोहळा, फटाक्यांची आतषबाजी, सीमा पोटे यांचा करमणुकीचा कार्यक्रम, आम्रपाली पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा आणि कुस्त्यांचा आखाडा झाला. आखाड्यात दिव्यांग मल्लांची कुस्तीदेखील प्रेक्षणीय ठरली.

तर ओतूरच्या अजिंक्य डुंबरे याने अंतिम मानाची कुस्ती जिंकली. त्याला चांदीची फिरती गदा व रोख पारितोषिक देण्यात आले. सरपंच वनराज शिंगोटे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मारुती शिंगोटे, उपाध्यक्ष उपेंद्र डुंबरे, कार्याध्यक्ष संदीप गंभीर, उद्योजक मनोज डुंबरे, भास्कर शिंगोटे, शांताराम बोडके, राजाराम नलावडे या वेळी उपस्थित होते.

खामुंडीच्या श्री काळभैरवनाथांची यात्रा आणे, माळशेजपट्ट्यात प्रसिध्द आहे. दिवसभरात हजारो भाविकांनी गर्दी करत श्री काळभैरवनाथांचे दर्शन घेतले. यात्रेनिमित्त संपूर्ण मंदिर परिसरात नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच फुलांची आकर्षक सजावट व रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला.

Back to top button