पिंपळनेर : राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे मालट्रकचा एक्सेल तुटला आणि ….  | पुढारी

पिंपळनेर : राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे मालट्रकचा एक्सेल तुटला आणि .... 

पिंपळनेर,जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा – पिंपळनेर शहराच्या मध्यवर्ती भागातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पंचमुखी कॉर्नरजवळ रस्त्याची झालेली दुरावस्था व रस्त्यावरील वाढत्या खड्यांमुळे चालत्या ट्रकचे मागील एक्सेल व लोखंडी पाटे तुटुन दोन्ही टायर निखळल्याची घटना घडली आहे. यामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे महामार्गांवर वाहतूक खोळंबली होती. याच मार्गावरील गेल्या आठवड्यात ट्रकचा टायर फुटल्याने बसस्थानक परिसरातील एका दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

शहराच्या मध्यवर्ती भागातून गेलेल्या महामार्गावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यामध्ये ट्रकचे टायर निखळल्याने ट्रक जागीच थांबला. त्यामुळे रस्त्यावर दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागली होती. बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या काही दिवसांपासून रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम रखडले आहे. काही तांत्रिक व न्यायप्रविष्ठ बाबींमुळे शहरातील दीड किलोमीटर रस्त्याचे काम खोळंबल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर दररोज किरकोळ अपघाताच्या घटना घडत असतात.

नागरिकांना जीव मुठीत धरून जावं लागत आहे. तसेच रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनांच्या रहदारीमुळे धुळीचे प्रमाण देखील वाढले आहे. पावसाळ्यात याच खड्ड्यांमध्ये पाणी साचून खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. म्हणून नागरिकांना प्रत्येक ऋतूमध्ये या रस्त्यापासून त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार अधिकाऱ्यांना यासंदर्भात धारेधर धरले असतांनाही या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून याची चौकशी करून वस्तुस्थिती समोर येण्याची गरज आहे. महसूल विभागाच्या अधिक सत्याची नेमकी हकीकत जाणून घेऊन इतर अधिकाऱ्यांना पाचारण करून निष्पक्षपातीपणे या रस्त्याची पूर्व इतिहास काढून संबंधित प्रशासनाला सादर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गुरुवार (दि.23) ट्रक (टीएन 88) झेड-1129) गुजरात राज्याकडे जात असतांना पिंपळनेर सटाणा रोडवरील पंचमुखी कॉर्नर जवळील हॉटेल डिस्को समोर रस्त्यावर असलेल्या खड्यात ट्रकचे मागील टायर अडकले. यामुळे ट्रकचे एक्सेल व लोखंडी पार्ट तुटल्याने एका बाजूचे टायर निखळले. सुदैवाने टायर एक खड्यातच अडकून पडल्याने कोणालाही दुखापत व जीवितहानी झाली नाही. यामुळे खूप काळ पिंपळनेर सटाणा रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांना या अडचणीचा सामना करावा लागला रस्त्याचे कधी नूतनीकरण कॉक्रिटीकरण करणार आहेत,असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button