…त्या खून प्रकरणातील संशयित अखेर जेरबंद | पुढारी

...त्या खून प्रकरणातील संशयित अखेर जेरबंद

राहू(ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : खामगाव येथील खुनातील संशयित जेरबंद करण्यास यवत पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव पिंटू अशोक गायकवाड (रावणगाव खडकी, ता. दौंड) असे आहे. याबाबतचे वृत्त असे की, खामगाव येथील दुग्धव्यावसायिक कुणाल सदाशिव कवडे यांच्या गोठ्यावरील कामगार मुकेश ऊर्फ मुक्तार यादव (वय 45, रा. धरमपूर, उत्तर प्रदेश) याचा धारदार हत्याराने गळा चिरून खून करण्यात आला होता, तर रामकुमार यादव (वय 44, रा. डिग्गी, उत्तर प्रदेश) याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याबाबतची फिर्याद यवत पोलिस ठाण्यात दाखल होती.

पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी पोलिसांना सूचना केल्या होत्या. दरम्यान, यवत गुन्हे शोध पथकाला संशयित पिंटू अशोक गायकवाड हा रावणगाव परिसरात दिसून आल्याची माहिती मिळाली. गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी वेशांतर करून सापळा लावून पिंटूला ताब्यात घेतले.

पिंटू हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर श्रीरामपूर (जि. अहमदनगर) शहर पोलिस ठाणे येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला प्रथवर्ग न्याय दंडाधिकारी दौंड यांच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कामगिरी यवत येथील गुन्हे शोध पथक तसेच पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत मदने, पोलिस हवालदार नीलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय
यादव, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, गणेश कुतवळ, पोलिस जवान मारुती बाराते यांच्या पथकाने केली.

Back to top button