खडकवासला धरणसाखळीतून मार्चमध्ये 3.97 टीएमसी पाण्याचा वापर | पुढारी

खडकवासला धरणसाखळीतून मार्चमध्ये 3.97 टीएमसी पाण्याचा वापर

पुणे : उन्हाचा कडाका चांगलाच वाढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन, पाणीचोरी, गळती आणि सिंचन आवर्तन यामुळे मार्च महिन्यातच पुढील अडीच महिने पुरेल एवढा पाणीसाठा संपला आहे. गेल्या महिन्यात खडकवासला धरणसाखळीतून सुमारे 3.97 अब्ज घनफूट पाण्याचा वापर करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

शहराला खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो, तर शहराच्या पूर्व भागाला काही प्रमाणात भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा होतो. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चार धरणांत मिळून 13.71 टीएमसी (47 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.

टेमघर धरणात केवळ 0.33 टीएमसी (नऊ टक्के), वरसगाव धरणात 7.82 टीएमसी (60.95 टक्के), पानशेत धरणात 4.53 टीएमसी (42.56 टक्के) आणि खडकवासला धरणात 1.03 टीएमसी (51.99 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, 1 मार्च रोजी चारही धरणांत मिळून 18.58 टीएमसी (63.73 टक्के) पाणीसाठा होता. 31 मार्च रोजी हा पाणीसाठा 14.61 टीएमसीपर्यंत कमी झाला.

म्हणजेच केवळ मार्च महिन्यात 3.97 टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला. उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. तसेच धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन, पाणीचोरी व गळती, याशिवाय ग्रामीण भागाला सिंचन आवर्तन सुरू असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा संपल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

पाणी जपून वापरण्याचे आवाहन
यंदा मोसमी पावसाचे उशिरा आगमन होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार महापालिका आणि जलसंपदा विभागाने 15 ऑगस्टपर्यंत पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन केले आहे. सध्या चारही धरणांत मिळून 13.71 टीएमसी (47 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.

Back to top button