विविध मागण्यांसाठी माजी आमदार शरद सोनवणे यांचे बेमुदत उपोषण | पुढारी

विविध मागण्यांसाठी माजी आमदार शरद सोनवणे यांचे बेमुदत उपोषण

आळेफाटा; पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे होत असलेले हल्ले रोखण्यासाठी वनविभागाने उपाययोजना कराव्या, बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना न करता शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करणाऱ्या उपवनसंरक्षक अमोल सातपुते याचे तात्काळ निलंबन करावे, या मागणीसाठी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी शुक्रवार (दि २४) सकाळी दहा वाजल्यापासून आळेफाटा चौकात बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

जुन्नर तालुक्यात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. गेल्या चार महिन्यात पूर्व भागातील आळे, कांदळी, काळवाडी, पिंपरीपेंढार शिरोली बुद्रुक येथे बिबट्याचे हल्ल्यात तीन बालके, महिला व तरुण मृत्यूमुखी पडले असून किमान चार ते पाच जण जखमी झाले आहेत. त्यातच पिंपरीपेंढार येथील घटनेनंतर तेथील शेतक-यांवर वनविभागाच्या वतीने गुन्हे दाखल केले आहेत. बिबट्यांचे हल्ले दिवसागणिक वाढत असताना वनविभागाने ठोस उपाययोजना करावी, तसेच जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांचे निलंबन करावे, यासाठी माजी आमदार शरद सोनवणे यांनी आजपासून आळेफाटा चौकात उपोषणास सुरुवात केली.

आज सकाळी दहा वाजता त्यांनी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपोषणास सुरुवात केली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्न डोके, पिंपळवंडी उपसरपंच मयूर पवार, प्रदीप देवकर, संतोष घोरणे, गणेश गुंजाळ, सौरभ डोके, निलेश शिंदे, निलेश भुजबळ, संजय गाढवे, समीर देवकर यांचेसह ग्रामस्थ, शेतकरी व मेंढपाळ मोठ्या संख्येत उपस्थित होते. वनविभागाचा मनमानी कारभार थांबला पाहिजे, शेतकऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या व अमोल सातपुते यांचे निलंबन झालेच पाहिजे, अशा घोषणा यावेळेस देण्यात आल्या.

यावेळी बोलताना प्रसन्न डोके यांनी पिंपरी पेंढार मधील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, बिबट्यांचे हल्ले रोखण्यात योग्य नियोजन करत नसल्यामुळे उपवनसंरक्षकांची तातडीने बदली करावी, पकडलेल्या बिबट्यास कॉलर आयडी बसवावी व त्यांची नसबंदी करावी अशी मागणी केली. यावेळी बोलताना माजी आमदार शरद सोनवणे म्हणाले की, जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे होणारे हल्ले रोखण्यात वनविभाग अपयशी ठरले आहे. यामुळे लहान बालकांसह तरूण व महिला यांना आपले जीव गमवावे लागले आहेत. याउलट पिंपरीपेंढार येथील घटनेनंतर तेथील शेतकऱ्यांवरच तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांना न विचारता गुन्हे दाखल केले. या सर्व घटनांना जबाबदार असलेल्या वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी करत जलसंपदा विभागाची माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रालगतची जलसंपदा विभागाची जागा तातडीने संपादित करून तेथे अधिकचे बिबटे ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, आंबेगाव तालुक्यात नेलेले वनविभाग कार्यालय तातडीने पुन्हा नारायणगाव येथे सुरू करावे. तसेच तातडीने बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंज-याची संख्येत वाढ करावी, या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

हेही वाचा : 

Back to top button