पुणे वाहतूक विभागातील बदलीनंतरही ‘त्या’ पोलिसावर मेहरबानी? | पुढारी

पुणे वाहतूक विभागातील बदलीनंतरही ‘त्या’ पोलिसावर मेहरबानी?

पुणे :  पुढारी वृत्तसेवा :  वाहतूक विभागातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर तडकाफडकी बदली करण्यात आलेले एक पोलिस कर्मचारी अद्यापदेखील आहे त्याच ठिकाणी कर्तव्यावर असल्याचे समोर आले आहे. तत्कालीन वाहतूक पोलिस उपायुक्तांच्या कार्यकाळात ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांची वाहतूक विभागातून थेट विश्रामबाग पोलिस ठाण्यात उचलबांगडी करण्यात आली होती.

संबंधित कर्मचार्‍याला पाच महिन्यांनंतर देखील कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कोणाची एवढी मेहरबानी असा सवाल निर्माण झाला आहे. सध्या हे पोलिस कर्मचारी येरवडा येथील वाहतूक पोलिस उपायुक्त विभागातून डिओ (ड्यूटी ऑफिसर) चे कामकाज ’चोख’ बजावत आहेत. दरम्यान गेल्यावर्षी शहरातील वाहतूक समस्येमुळे वाहतूक पोलिसांना पुणेकरांच्या टीकेचे धनी व्हावे लागले होते. दररोजची वाहतूक कोंडी, वाहतूक पोलिसांचा नियमनापेक्षा कारवाईवरील अधिक रस’, आणि ऐन रहदारीच्या वेळीही पोलिस रस्त्यांवरून ’गायब’ यामुळे नागरिकांकडून थेट पोलिस आयुक्तांना धारेवर धरले गेले होते.

या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत तत्कालीन वाहतूक पोलिस उपायुक्तांच्या कारभारावर लक्ष्य ठेवण्याची जबाबदारी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्याकडे दिली. त्यांनी अनागोंदी कारभारावर अंकुश ठेवत मलाईदार काम करणार्‍या कर्मचार्‍यांची कुंडली तयार केली. त्यानंतर वाहतूक विभागात मातब्बर काम करणार्‍या चार कर्मचार्‍यांची पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली.

मुख्यालयाचे तत्कालीन पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले होते. बदली झालेल्या कर्मचार्‍यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र, तरी हे कर्मचारी तेथेच आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. सध्या त्यांच्यावर मोठ्या कामाची जबाबदारी आहे. त्यांचा वाहतूक विभागातील जनसंपर्क तगडा आहे. शिवाय खाच-खळग्यांची मोठी माहिती त्यांना आहे. कोठे नाक दाबल्यानंतर तोंड उघडते हे तर त्यांनी चांगलेच अवगत केले आहे. त्यामुळे भलत्याच भानगडी नको म्हणून प्रत्येक वाहतूक परगाण्याचा ’रखवालदार’ नित्यनियमाने त्यांची महिन्याकाठी सदिच्छा भेट घेतो.

 

Back to top button