बैलगाडा शर्यतीत शर्मिलाची घोडेस्वारी ! गावोगावच्या घाटांत कौतुक | पुढारी

बैलगाडा शर्यतीत शर्मिलाची घोडेस्वारी ! गावोगावच्या घाटांत कौतुक

कोंढवा; पुढारी वृत्तसेवा : बैलांची शर्यत असो अथवा झुंज, चांगल्या चांगल्याच्या अंगावर काटा उभा राहतो..! घाटातील शर्यत म्हटली की, सेकंदावर धावणारी अवखळ बैले… अशा बैलांपुढे घोड्यावर स्वार होऊन अखेरच्या क्षणी त्यांना काबूत आणण्याचे धाडसी काम चौदा वर्षांची शर्मिला शिळीमकर करीत आहे. प्रत्येक घाटामध्ये तिचे तोंड भरून कौतुक होत आहे.

धनकवडी येथील शर्मिला ही योगगुरू दीपक महाराज शिळीमकर यांची मुलगी असून, ती सध्या हुजूरपागा शाळेत इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत आहे. लहानपणापासून प्रत्येकाला एखाद्या छंदाची आवड असते, तशीच शर्मिला हिला घोडेस्वारी आवड होती आणि तिने ती जोपासलीही आहे. घोडेस्वारी करण्यासाठी सुरक्षित जागा खूप आहेत; परंतु शर्मिलाने बैलांच्या शर्यतीच्या घाटात आपले कौशल्य दाखविण्यास सुरुवात केली आहे.

बैलगाड्यांच्या शर्यतींत फक्त धाडसी पुरुषच घोडे चालवण्याचे सराव करतात व भाग घेतात. कारण या स्पर्धेमध्ये धोके खूप असतात आणि सेकंदांचा खेळ असतो. चालकाविना चौखुर उधळणारे चार बैले बेभान पळत असतात. बैलांना शेवटच्या क्षणी काबूत आणणे व त्यांना पकडणे हे घोडेस्वाराचे काम असते. बैल मारके असतील, तर घोड्यासह स्वाराला ते मारतात. अशा घाटातील शर्यतीमध्ये शर्मिला भाग घेत असून, सध्या ती गावोगावांच्या यात्रांना जात आहे.

केंदुरच्या घाटात केला विक्रम
घाटातील बैलगाडा शर्यतींमध्ये घोडेस्वारीचे साहस करणारी शर्मिला ही पहिलीच मुलगी आहे. तिला याबाबतचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. केंदुरच्या घाटामध्ये तिने रेकॉर्ड केले असून, दहा सेकंदांच्या आत घोडी पळवून हा घाट पार केला आहे. विशेष म्हणजे सध्या तिची वार्षिक परीक्षा असूनसुद्धा ती शक्य तेथील बैलगाडा शर्यतींना जात आहे. तिला जॅकी वैभव निकाळजे आणि शंतनू यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

Back to top button