पुण्यातील तरुणाईचे वर्दीच्या वर्मावर बोट! नियम तोडणार्‍या पोलिसांचे फोटो टि्वटरवर | पुढारी

पुण्यातील तरुणाईचे वर्दीच्या वर्मावर बोट! नियम तोडणार्‍या पोलिसांचे फोटो टि्वटरवर

महेंद्र कांबळे

पुणे : चौका-चौकात थांबलेल्या वाहतूक पोलिसांच्या कारवाईने वैतागलेल्या पोलिसांवर पुणेकरांचा वॉच असल्याचे दिसत आहे. टि्वटर माध्यमातून वाहतूक नियम मोडणार्‍या पोलिसांचे फोटो टॅग करून जागरुक पुणेकरांनी ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान…’ म्हणत कारवाई फक्त सामान्य नागरिकांवर का? असा प्रश्न उपस्थित केला.

पुणे पोलिस टि्वटर वापरण्यात आघाडीवर आहे. कोरोना काळात चांगले काम करणार्‍या पोलिसांच्या टि्वटर स्टोरी खूपच गाजल्या. पुणे पोलिसांनी जिवाची बाजी लावत नागरिकांसाठी असे काम केले की, त्याची पावती नागरिकांनी तेव्हा तेव्हा पुणे पोलिसांना दिली. मात्र, हल्ली चोरांसाठी सापळा रचावा तसा सापळा चौका-चौकात लावून पोलिस सामान्य नागरिकांच्या गाड्या तपासत असताना दुसरीकडे पुणेकरही टि्ववरवर वाहतूक नियम तोडणार्‍या पोलिसांचे फोटो टॅग करत आहेत.

असे टि्वट अन् अशी कारवाई…
नो पार्किंग भागात बुलेट पार्क केली हा फोटो टि्वटरवर टॅग होताच पोलिसांनी ई-चलान फाडून चलानही टि्वट केले. कृषी महाविद्यालय चौकातून विरुध्द दिशेने जाणार्‍या दुचाकी चालविणार्‍या पोलिसाचा फोटो नागरिकाने टाकला आहे. एका वकिलाने विनाहेल्मेट असलेल्या पोलिसाचा फोटा टि्वट करताना पोलिसाने वर्दी परिधान केली नाही, दुचाकीच्या दोन्ही बाजूला आरसे नाहीत, फक्त गाडीवर पोलिसाचे चिन्ह आहे, असे दाखवून दिले आहे.

नागरिकांच्या तक्रारींची दखल
सामान्य नागरिकांनी पोलिसांबरोबरच अन्य नागरिकांच्याही चुका दाखवल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. नागरिकांनीच नागरिकांच्या केलेल्या तक्रारींची तत्परतेने दखल घेतली आहे.

Back to top button