मंचर : मंचर बाजार समितीची निवडणूक ताकदीने लढविणार : आढळराव पाटील | पुढारी

मंचर : मंचर बाजार समितीची निवडणूक ताकदीने लढविणार : आढळराव पाटील

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शिवसेना-भाजप पक्षांच्या वतीने ताकदीने लढविणार आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, अशी सूचना शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शुक्रवारी (दि. 31) पदाधिकार्‍यांना दिली. मंचर येथील आढळराव पाटील यांच्या संपर्क कार्यालयात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना-भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली, त्या वेळी आढळराव पाटील बोलत होते.

भाजपचे तालुकाप्रमुख डॉ. ताराचंद कराळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अरुण गिरे, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, विजयराव पवार, रवींद्र करंजखेले, तुकाराम काळे, सचिन बांगर, युवानेते स्वप्निल बेंडे पाटील, संतोष डोके, धनेश मोरडे, सुशांत थोरात, गणेश बाणखेले, मालतीताई थोरात यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

आंबेगाव तालुक्यात सहकारामध्ये यापूर्व काळात आपण लक्ष घातले नव्हते. परंतु, आता लक्ष घालण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकर्‍यांनी फोन करून बाजार समितीच्या कारभाराकडे लक्ष देण्यासाठी विनंती केली आहे. त्यामुळे येथून पुढे होणार्‍या सर्वच निवडणुका शिवसेना आणि भाजप पक्षांच्या समन्वयाने लढविल्या जातील.

मंचर बाजार समितीत चाललेल्या कारभारावर शेतकरी नाराज आहे. जनावरांचा बाजार, भाजी बाजार बंद आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, बाजार समितीतील पारदर्शक कारभार देण्यासाठी शिवसेना आणि भाजप पक्षांच्या वतीने पूर्ण पॅनेल तयार करून निवडणूक लढविली जाणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.

Back to top button