मंचर : ‘समृद्धी’सारख्या अनेक महामार्गांचे नियोजन; डॉ. गायकवाड यांची माहिती | पुढारी

मंचर : ‘समृद्धी’सारख्या अनेक महामार्गांचे नियोजन; डॉ. गायकवाड यांची माहिती

मंचर (ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गासारखे अनेक रस्ते आणि महामार्ग तयार करण्याचे नियोजन असून, त्याद्वारे दळणवळण सुलभ केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी ही माहिती दिली. जाधववाडी येथील तुकाईदेवी यात्रेनिमित्त डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.

कार्यक्रम प्रसंगी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पै. मंगलदास बांदल, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अरुण गिरे, वरिष्ठ पत्रकार रमेश जाधव, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपतराव फुले, जिल्हा परिषदेचे सदस्य देविदास दरेकर, ज्येष्ठ पत्रकार डी. के. वळसे पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मोहन साळी, बालरोगतज्ज्ञ डॉ. कैलास धायबर, अ‍ॅड. सुनील बांगर, सरपंच अंकुश थोरात आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

या वेळी देवदत्त निकम म्हणाले की, राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव म्हणून कार्यरत राहिलेल्या डॉ. अनिलकुमार गायकवाड यांचे शासनस्तरावरील कामकाज हे उल्लेखनीय आहे. गायकवाड यांच्यामुळेच समृद्धी महामार्ग पूर्णत्वास जात असल्याचे गौरवोद्गार निकम यांनी काढले. सत्कार समारंभ वरिष्ठ पत्रकार रमेश जाधव यांच्या निवासस्थानी झाला. प्रास्ताविक जाधववाडी गावचे माजी उपसरपंच चेतन जाधव यांनी केले. वरिष्ठ पत्रकार रमेश जाधव यांनी आभार मानले.

Back to top button