नसरापूर : बकाल वाड्यात रुग्णांवर औषधोपचार; आरोग्य केंद्र झाला कोंडवाडा | पुढारी

नसरापूर : बकाल वाड्यात रुग्णांवर औषधोपचार; आरोग्य केंद्र झाला कोंडवाडा

माणिक पवार

नसरापूर ( ता. भोर ) : नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था कोंडवाड्याहून अधिक बिकट झाली आहे. अनेक सुविधांचा अभाव, अनेक जागा रिक्त, कोंदट वातावरण, कमी जागेअभावी होणारी कुंचबणा, अशा अवस्थेत देखील जीर्ण वाड्यात डॉक्टर जीव मुठीत घेऊन रुग्णांवर औषधोपचार करीत आहेत. यामुळे अनेकांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  नसरापूर येथील पंतसचिवकालीन जीर्ण वाड्यात स्वातंत्र्यकाळापासून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे.

येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे काम समाधानकारक आहे; मात्र आरोग्य केंद्राच्या इमारतीला जागोजागी भेगा, चिरा पडल्या असून, इमारतीचे छत पावसाळ्यात गळते. जागेअभावी आंतररुग्ण कक्षात आशासेविकांना मासिक सभा व इतर कामकाज करावे लागत आहे. आरोग्य केंद्रात रुग्णांना बसायला पुरेशी जागादेखील नसून, तपासणी कक्षातच डॉक्टर व परिचारिकांना भोजन करावे लागत आहे. यामुळे रुग्णांची सेवा देताना डॉक्टरसह परिचारिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच या आरोग्य केंद्रासह इतर पाच केंद्रांसाठी एकच लिपिक काम सांभाळत आहे. यामुळे प्रशासकीय कामांना विलंब लागत आहे.

बाह्यरुग्ण या एकाच खोलीतून डॉक्टरांना मोठी कसरत करून कारभार चालवावा लागत आहे. रात्रपाळी करताना वैद्यकीय डॉक्टर व कर्मचारी यांना स्वतंत्र अशी खोलीची व्यवस्था नाही. तसेच जागेची कमरता असल्याने एखाद्या रुग्णांची आजाराबाबत गुप्तता पाळणे कठीण होते. यामुळे रुग्णांची कुचंबणा होते. काही वेळा अशा रुग्णांची तपासणी प्रसूतिगृहात करावी लागते. आजाराची लाट आल्यावर रुग्णांची व नातेवाईक यांची होणारी दाटीवाटीमुळे आरोग्य केंद्रातूनच आजाराची अधिक बाधा वाढत आहे. प्रशस्त जागेअभावी सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. अवस्थेबाबत लोकप्रतिनिधीसह वैद्यकीय अधिकार्‍यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करूनदेखील याकडे काणाडोळा करीत असल्याचे बोलले जात आहे.

Back to top button